Parlekar will decide on the issue of North Central Mumbai MP? | यंदाही पार्लेकरच ठरविणार उत्तर मध्य मुंबईचा खासदार?

यंदाही पार्लेकरच ठरविणार उत्तर मध्य मुंबईचा खासदार?

खलील गिरकर

उत्तर मध्य मतदारसंघात सोमवारी ५३.६९ टक्के मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ४८.६७ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे ही ५.०२ टक्क्यांची वाढ कुणाला विजय मिळवून देते व कुणाला पराभवाच्या गर्तेत नेते याची उत्सुकता आहे. वाढलेली मते आपल्याच हिताची असल्याचा दावा भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.

या मतदारसंघातील १६ लाख ७९ हजार ७३१ मतदारांपैकी ७ लाख ६३ हजार ०९३ महिला मतदार होत्या. त्यापैकी ४ लाख ४ हजार ९७५ महिलांनी मतदान केले. तर ९ लाख १६ हजार ६१६ पुरुष मतदारांपैकी ४ लाख ९६ हजार ४९७ मतदारांनी मतदान केले. अशा प्रकारे एकूण ९ लाख १ हजार ४७७ जणांनी मतदान केले. २०१४ मध्ये या मतदारसंघात १७ लाख ३७ हजार ०८४ मतदार होते व ४८.६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

गेल्या निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात १ लाख ५१ हजार ९८० जणांनी मतदान केले होते. त्यापैकी महाजन यांना १ लाख १० हजार २०१ मते मिळाली होती, तर प्रिया दत्त यांना ३१ हजार २५४ मते मिळाली होती. एकूण मतदानापैकी महाजन यांना तब्बल ७२ टक्के मते मिळाली होती. महाजन यांच्या एकूण मताधिक्यामध्ये विलेपार्लेचे मताधिक्य ७८ हजार इतके प्रचंड होते. काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये सामील झाले होते व या निवडणुकीत ते भाजपच्या प्रचारामध्ये होते. या मतदारसंघातील २ लाख ६० हजार ८७३ मतदारांपैकी १ लाख ५९ हजार ६३९ जणांनी मतदान केले. विधानसभा मतदारसंघनिहाय सर्वात अधिक मतदान म्हणजे ६१.१९ टक्के मतदान या ठिकाणी झाले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातून विजयाचा दावा केला जात, असून गेल्या वेळी पेक्षा अधिक मताधिक्य मिळण्याचा दावा केला जात आहे.

वांद्रे पश्चिम २०१४ मध्ये १ लाख ४३ हजार ७४८ जणांनी मतदान केले होते. त्यापैकी महाजन यांना ७८ हजार ५४७ मते तर दत्त यांना ४९ हजार ३८० मते मिळाली होती. यंदा या ठिकाणी ५२.४५ टक्के मतदान झाले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा हा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातील मतदानाकडे भाजपचे लक्ष आहे.

वांद्रे पूर्व मध्ये २०१४ ला १ लाख २२ हजार ५५५ मतदारांपैकी महाजन यांना ६२ हजार ५१२ मते तर दत्त यांना ४९ हजार २७० मते मिळाली होती. यंदा मतदानाचे प्रमाण ५२.७४ टक्के आहे. कलिना मध्ये २०१४ ला १ लाख २४ हजार १६० मतदारांपैकी महाजन यांना ६६ हजार २५७ तर दत्त ४३ हजार ५५६ मते मिळाली होती. यावेळी २ लाख ३५ हजार ६६५ मतदारांपैकी १ लाख २९ हजार ८५६ जणांनी मतदान केले हे प्रमाण ५५.१० टक्के आहे.

चांदिवली मध्ये २०१४ ला १ लाख ७२ हजार ८७५ मतदान झाले त्यापैकी महाजन यांना ९३ हजार ८३ मते तर दत्त यांना ६३ हजार १६० मते मिळाली. यावेळी ३ लाख ७० हजार ८०८ मतदारांपैकी १ लाख ८८ हजार ३२४ जणांनी मतदान केले हे प्रमाण ५०.७९ टक्के आहे. उत्तर मध्य मधील विलेपार्ले, कलिना, वांद्रे पश्चिम येथील मतदान महाजन यांच्या पारड्यात तर कुर्ला व वांद्रे पूर्व, चांदिवली या मतदारसंघातील मतदान दत्त यांच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. विलेपार्ले येथील मतदानाचा वाढलेला टक्का व सर्वात जास्त झालेले मतदान याचा लाभ एकत्रितपणे महाजन यांना होण्याची शक्यता आहे. मनसेने दत्त यांच्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे निकालाचा कल बदलण्याचे नाकारता येत नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parlekar will decide on the issue of North Central Mumbai MP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.