पार्किंगचे नियम कडकच असायला हवेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:41 AM2019-11-28T02:41:13+5:302019-11-28T02:42:09+5:30

गेल्या तीन वर्षांत मुंबईतील कारची घनता २३ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईतील कारची घनता ही प्रति किमी ५३० आहे. पुणे ३५९, कोलकाता ३१९, चेन्नई २९७, बंगळुरू १४९ अशी कारची घनता आहे.

Parking rules should be strict ... | पार्किंगचे नियम कडकच असायला हवेत...

पार्किंगचे नियम कडकच असायला हवेत...

googlenewsNext

(संकलन : नितीन जगताप)
गेल्या तीन वर्षांत मुंबईतील कारची घनता २३ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईतील कारची घनता ही प्रति किमी ५३० आहे. पुणे ३५९, कोलकाता ३१९, चेन्नई २९७, बंगळुरू १४९ अशी कारची घनता आहे. दिल्लीची (१०८) मुंबईशी तुलना केल्यास मुंबईतील कारची घनता ही दिल्लीच्या पाचपट आहे. मुंबईत वाहनांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होते. ही कारची घनता जर कमी करायची असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि पार्किंगबाबतचे कठोर नियम आवश्यक आहेत, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले.

याबाबत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार सांगतात, मुंबईतील वाहनांची घनता सर्वांत जास्त आहे. एका किलोमीटरची लांबी एक हजार मीटर असते त्यामध्ये ५३० गाड्या आहेत. एका गाडीची लांबी पाच मीटर असते. यामध्ये काही गाड्या घरातही असतात. काही पार्किंगला असतात. त्यातील केवळ ४० टक्के गाड्या रस्त्यावर असतात. जेवढी रस्त्यावर वाहने जास्त तितकी गर्दी जास्त, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, काही वाहने निष्क्रिय वाहने असली तरी चालू वाहनांचा वेग कमी होईल. आपल्याला रस्त्याच्या लांबी आणि रुंदीच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी केली पाहिजे. वाहतूककोंडीवर उपाय म्हणून रस्ते वाढविले जातात, उड्डाणपूल बांधले जातात; पण या उपायांमुळे गाड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांची संख्या कितीही वाढविली तरी वाहनचालकाला ठरावीक ठिकाणी जावे-यावे लागते.

कोस्टल बांधला तरी त्याची सुरुवात आणि कोस्टल रोडच्या बाहेर वाहतूककोंडी होईल. आता नुकताच चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल हा सायन, धारावी या परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. परंतु हा पूल सुरू झाल्यानंतर बीकेसीतील भारतनगरसारखी वाहतूककोंडीची नवीन ठिकाणे उदयाला आली आहेत. वाहतूककोंडी जैसे-थेच आहे. फरक इतकाच की एका ठिकाणी होणारी वाहतूककोंडी आता दुसऱ्या ठिकाणी होत आहे. बस आणि रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढत नाही तोपर्यंत यातून सुटका होणार नाही. कारण बसमध्ये साधारण ४० जण प्रवास करतात तर कारमध्ये २ ते ३ जण प्रवास करतात. बस कारच्या तुलनेत तिप्पट जागा व्यापत असली तरी कारच्या १२ ते १३ पट प्रवासी बसमध्ये प्रवास करू शकतात. त्यामुळे रस्त्याच्या वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी बसचा वापर वाढला पाहिजे आणि कार कमी व्हायला हव्यात, असे ते म्हणाले.

पार्किंगबाबत दातार म्हणाले, सर्वांत मोठा प्रश्न आहे तो रस्त्यावर कुठेही पार्क केलेल्या वाहनांचा. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पार्क केलेली वाहने आढळतात. अशी वाहने निम्म्यावर आणली पाहिजेत. इतर देशांत फुकट पार्किंग देत नाहीत; आणि कुठेही पार्किंग केल्यास कारवाई केली जाते. नियम कडक असल्यामुळे जिथे पार्किंग आहे तिथेच लोक गाड्या उभ्या करतात. इतर कुठेही गाड्या उभ्या करीत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे लोक गाड्या कमी घेतात. आपल्याकडे कोणी कुठेही पार्किंग करतात. पालिकेने अनधिकृत पार्किंगविरोधात दंड आकारण्यास सुरुवात केली; पण त्याविरोधात आरडाओरड सुरू झाली ते चुकीचे आहे. दंड आकारल्याशिवाय लोकांना शिस्त लागणार नाही, या प्रकाराला आळा बसणार नाही. रस्ता ही सार्वजनिक जागा असते, ती खाजगी जागा नाही. इमारतीच्या परिसरात वाहने पार्क करावीत; पण रस्त्यावर उभी करू नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दातार यांनी इतर देशांमध्ये शिस्त असल्याचे सांगत न्यू यार्कसारख्या ठिकाणी गाडी रात्री पार्क करण्यासाठी महिन्याला ३५ हजार रुपये घेतात. इमारतींमध्ये पार्किंग उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कठोर नियम करायला हवेत. जुन्या गाड्या ही मोठी समस्या आहे. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो. त्या भंगारात काढल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे जुन्या बोटीचा वापर इतर ठिकाणी केला जातो तसा या गाड्यांचा वापर झाला पाहिजे. आज मुंबईत दरवर्षी ३० हजार वाहने भंगारात जातात. दरवर्षी हे प्रमाण वाढत जाईल. काच, रबर, गाडीचे भाग आदी गोष्टींचा पुनर्वापर करता येतो. काच, लोखंड नवीन वापरण्यापेक्षा हेच वापरले पाहिजे. वाहतूककोंडी होत असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, तसेच वाहनांचा वेग मंदावत आहे. सार्वजनिक वाहने वापरल्यास हे प्रदूषण कमी होईल आणि वाहनांचा वेग वाढेल. पोलिसांची कारवाई दहापट कठोर करण्याची गरज असल्याचेही दातार यांनी सांगितले.


सार्वजनिक व्यवस्थेचा दर्जा सुधारला पाहिजे
काळानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल व्हायला हवेत. खाजगी कारमध्ये एसीसह इतर सुविधा आढळतात, त्या मिळाल्या पाहिजेत. दर स्थिर असावेत, या सुधारणा हव्या आहेत. परंतु त्यासोबतच खाजगी वाहने कमी होणे गरजेचे आहे. मोफत पार्किंग मिळत असेल तर खाजगी वाहनांची संख्या वाढेल. तसेच दुरुपयोग होईल. गरज नसतानाही लोक वाहने पार्क करतील त्यामुळे पार्किंगचे दर जास्त असायला हवेत. तसेच तासानुसार हे दर वाढले पाहिजेत. उदा. एका तासाचे ५० असतील तर दुसºया तासाला ७५, तिसºया तासाला १०० रुपये आकारले पाहिजेत. त्यामुळे लोक कमी अंतर असेल तर चालत येतील किंवा जास्त अंतर असेल तर सार्वजनिक वाहनांचा वापर करतील. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधणे, रस्ता रुंदीकरण करणे म्हणजे वजन वाढले तर डायट न करता कपड्यांची साईज वाढविण्यासारखे आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी करणे हाच उपाय आहे.
- रणजीत गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ

पादचारी आणि सार्वजनिक बसला प्राधान्य द्यायला हवे
मी नुकताच भारत सरकारने लखनऊ येथे आयोजित केलेल्या अर्बन मोबिलिटी या परिषदेला गेलो होतो. तिथे सर्वांचे मत होते की, सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी गाड्या वाढविल्या पाहिजेत. मेट्रो प्रकल्प सुरू करताना गाड्या वाढविल्या असत्या तर कमी कार रस्त्यावर आल्या असत्या. तसेच खाजगी कारला मोफत पार्किंग न देता कठोर पावले उचलली पाहिजेत. सरकारने पार्किंग बांधले आहेत त्यांचा अनेक जण वापर करीत नाहीत. त्यामुळे देशाचे नुकसान होते. पार्किंगच्या सुविधा कमी केल्या की कमी कार रस्त्यावर येतील. नवीन शहरात येण्यासाठी वाहनांवर वेगळा कर आकारला जातो. त्यामुळे लोक चालत जातात आणि आपोआप वाहनांची संख्या कमी होते.
- विद्याधर दाते, समन्वयक, आमची मुंबई, आमची बेस्ट

Web Title: Parking rules should be strict ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.