Join us

शालेय साहित्य महागल्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:39 IST

उन्हाळी सुट्टीत रमलेल्या शालेय विद्यार्थ्यांची आता पुढच्या इयत्तेत जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्याकरिता तयारीला वेग आला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा शालेय साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

- खलील गिरकरमुंबई - उन्हाळी सुट्टीत रमलेल्या शालेय विद्यार्थ्यांची आता पुढच्या इयत्तेत जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्याकरिता तयारीला वेग आला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा शालेय साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परंतु, नवीन पुस्तके, वह्या, दप्तरे, वॉटर बॅग, गणवेश, पादत्राणे अशा आवश्यक गोष्टी खरेदी करण्याशिवाय पालकांपुढे कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे वाढत्या महागाईच्या दिवसांत पालकांची आर्थिक ओढाताण होत आहे. 

शाळांची उन्हाळी सुट्टी संपत आली आहे. दोन महिन्यांच्या दीर्घकालीन सुट्टीनंतर मुलांना शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ लागली आहे. दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्षासाठी तयारी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना नवीन इयत्तेसाठी पाठ्यपुस्तके, वह्या, सरावासाठी वह्या, पेन-पेन्सिल, कंपास पेटी, तसेच दप्तर, रेनकोट, बूट, गणवेश या गोष्टी लागतात. त्या खरेदी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पालकांची दुकानांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे.

काटकसर करण्याशिवाय कोणताही पर्याय नाहीकाही शाळांनी त्यांच्या शालेय शुल्कातही वाढ केली आहे. मात्र, मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी शिक्षण अत्यावश्यक असल्याने पालक अत्यंत काटकसर करत मुलांना शिकविण्यास प्राधान्य देत आहेत.  शैक्षणिक साहित्य बाबतच्या मुलांच्या मागण्याही पूर्ण करण्याकडे पालकांचा कल दिसत आहे.

शालेय साहित्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. पाल्यांना शिकवणे गरजेचे असल्याने कितीही दर झाले, तरी शालेय साहित्य खरेदी करणे पालकांना भाग असते. एकच पाल्य असलेल्यांना महागाईच्या दिवसांत खर्च करणे कसेबसे शक्य होत आहे. मात्र, ज्या पालकांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले आहेत  त्यांना या सर्व गोष्टी मॅनेज करणे अत्यंत जिकीरीचे होत आहे.-  प्रज्ञा ढेरे, पालक, भांडुप 

‘त्या’ साहित्याची  किंमत अधिककाही शाळा विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, सरावासाठी वह्या या सर्वांचे एकत्र पॅकेज करून विद्यार्थ्यांना खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. त्याकरिता सुमारे दोन ते अडीच हजार रुपये पालकांकडून घेतले जात आहेत. 

टॅग्स :शाळास्कूल शॉपिंग