Join us  

ऑनलाईन शिक्षणाचे तास पालकांना वाटतात अपुरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 6:42 PM

सरकारच्या धोरणावर ६९ टक्के पालकांची नाराजी; तास दीड ते तीन तास शिक्षण वाढविण्याची मागणी

मुंबई : आँनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा ‘स्क्रिन टाईम’ वाढत असून त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारने इयत्तेनुसार या शिक्षणाचे तास ठरवून दिले आहेत. पूर्व प्राथमिक ते नववी पर्यंतच्या शिक्षणासाठी अर्धा ते तीन तासांपर्यंतचे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, पालकांना हे तास अपुरे वाटतात. आँनलाईन शिक्षणाची वेळ वाढवायला हवी असे मत ६९ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे. तर, सरकारने घातलेले वेळेचे बंधन २९ टक्के पालकांना योग्य वाटते.

गेल्या चार महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्या पुन्हा केव्हा सुरू होतील याचे ठोस उत्तर कुणाकडेही नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात निर्माण झालेला हा अडथळा दूर करण्यासाठी आँनलाईन शिक्षण पद्धती स्वीकारण्यात आली. त्यानुसार शिक्षणही सुरू झाली. मात्र, या शिक्षणाच्या दुपरिणांमांबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यात हस्तक्षेप केला. या शिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्यांनी नुकत्याच जारी केल्या आहेत. त्यात प्रत्येक इयत्तेनुसार स्क्रिन टाईम किती असावा याबाबतचे निर्देश आहेत. या मार्गदर्शक तत्वांबाबत आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या शिक्षणाच्या तासांबाबत पालकांची मते जाणून घेण्यासाठी लोकल सर्कल या संस्थेने नुकतेच एक आँलनाईन सर्वेक्षण केले. २३४ जिल्ह्यांतील २१ हजार ३२२ पालकांनी त्यात आपली मते नोंदवली. त्यात शिक्षणासाठी ठरवून दिलेली वेळ पालकांना अपुरी वाटत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

-    पूर्व प्राथमिक वर्गांसाठी केवळ अर्धा तासच आँनलाईन वर्ग घ्या असे सरकारचे निर्देश आहेत. परंतु, ते किमान एक तासांचे असावे असे ५६ टक्के पालकांनी सांगितले आहे.

-    पहिली ते पाचवीसाठी दीड तासांचा कालावधी निश्चित झाला हे. मात्र, ५६ टक्के पालक त्यावर नाराज आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण दोन तासांचे असावे असे ४२ टक्के पालकांना वाटते. तर, तीन तास शिक्षण योग्य आहे असे ३८ टक्के पालक सांगतात.  

-    सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने फक्त दीड तासांचा स्क्रीन टाईम ठरवून दिला आहे. ५९ टक्के पालकांना तो कमी वाटत असून तो किमान चार तास करा असे ३१ टक्के पालक सांगतात. तर, तीन, अडीच आणि दीड तासांच्या शिक्षणाचा आग्रह धरणा-या पालकांची संख्या अनुक्रमे ३१, दोन आणि २९ टक्के आहे.

-    नववी ते बारावीच्या विद्यार्थी तीन तास आँनलाईन शिक्षण घेतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या शिक्षणाचा कालावधी दररोज किमान पाच तास तरी हवा असे ३१ टक्के पालकांना वाटते. चार आणि तीन तास शिक्षण असावे असे सांगणा-या पालकांची संख्या अनुक्रमे ३१ आणि ४९ टक्के आहे.

पालकांना अभ्यासक्रमाची चिंता

शैक्षणिक वर्षांचा अभ्यासक्रम त्यात पूर्ण होणार नाही ही पालकांना चिंता आहे. तर, स्क्रिन टाईम कमी करायचा असेल तर तो अभ्यासाव्यतिरीक्त करणे जास्त सोईस्कर असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारचे हे आदेश लागू करणे राज्य सरकारवर बंधनकारक नसले तरी सर्वेक्षणातून पालकांचा कल अधोरेखीत होते. सरकारला धोरण ठरविताना तो उपयुक्त ठरेल असे लोकल सर्कलचे मत आहे.     

 

टॅग्स :ऑनलाइनशिक्षणशिक्षण क्षेत्रसरकारडिजिटल