पालकांना तीर्थक्षेत्राऐवजी न्यायालयाची पायरी दाखवतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:14 IST2025-11-15T08:14:09+5:302025-11-15T08:14:50+5:30
Court News: आपल्या संस्कृतीत रुजवलेली नैतिक मूल्ये इतकी घसरली आहेत की, पालकांना घेऊन तीर्थयात्रेला जाताना वाटतेच आपला जीव सोडणाऱ्या श्रावण बाळाला पूर्णपणे विसरलो आहोत.

पालकांना तीर्थक्षेत्राऐवजी न्यायालयाची पायरी दाखवतात
मुंबई - आपल्या संस्कृतीत रुजवलेली नैतिक मूल्ये इतकी घसरली आहेत की, पालकांना घेऊन तीर्थयात्रेला जाताना वाटतेच आपला जीव सोडणाऱ्या श्रावण बाळाला पूर्णपणे विसरलो आहोत. आज मुले पालकांना तीर्थयात्रेला नेण्याऐवजी न्यायालयाची पायरी चढण्यास भाग पाडत आहेत, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात खंत व्यक्त केली. तसेच आई-वडिलांच्या उपचारांसह त्यांचा सर्व खर्च उचलण्याचे आणि त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देत जर मुलाने या आदेशाचा भंग केला तर त्याच्यावर अवामन कारवाई करण्यात येईल, असेही बजावले.
जानेवारी २०१८मध्ये शहर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मुलाच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हे निरीक्षण नोंदविले. याचिकाकर्त्याचे पालक कोल्हापूरला राहतात. मात्र, ते वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आल्यावर मुलाच्या गोरेगाव (पूर्व) येथील घरात राहतात. त्यांना त्या घराचा वापर करण्यासाठी मनाई करावी, अशी मागणी मुलाने केली. पालकांची गैरसोय होता कामा नये, त्यांना आदराने व प्रेमाने वागवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.
काय म्हणाले न्यायालय?
‘आजच्या युगात, आपल्या मुलांच्या संगोपनात काहीतरी गंभीर चूक होत आहे, असे वाटते. मुले पालकांना तीर्थयात्रेला नेण्याऐवजी कोर्टात खेचत आहेत. पालकांची काळजी घेणे, हे केवळ पवित्र आणि नैतिक कर्तव्य नसून तो एक प्रेमाचा भाग आहे.
जेव्हा आपण पालकांचा आदर, प्रेम आणि काळजी घेण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो केवळ कृतज्ञतेचा भाव असतो. एकप्रकारे देवाचा सन्मान असतो.
दुर्दैवाने वास्तव कधी कधी कठोर असते. ’पालक दहा मुलांची काळजी घेऊ शकतात. पण, कधी कधी दहा मुले पालकांची काळजी घेऊ शकत नाहीत,’ अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली.
मुलाने पालकांचा सर्व खर्च उचलावा
संबंधित दाम्पत्याला तीन मुले आहेत. एक मुंबईत राहतो, दुसरा नवी मुंबईत, तर तिसरा कोल्हापूरमध्ये राहतो. ते वैद्यकीय उपचारासाठी नियमितपणे मुंबईत येतात. पालकांनी उपचारासाठी मुंबईत येण्यापूर्वी मुलाला कळवावे आणि त्यांना संबंधित ठिकाणी घेण्यासाठी बोलवावे.
निवासस्थानी जाताना आणि रुग्णालयात उपचार घेताना मुलाने पालकांसोबत राहून त्यांना सर्व प्रकारची मदत करावी आणि त्यांच्या उपचारासह सर्व खर्च उचलावा.
उपचार घेतल्यानंतर पालकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत त्यांना पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे आदेश न्यायालयाने मुलाला दिले.