Join us

चांदीवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची हायकोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 12:20 IST

Parambir Singh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकसदस्यीय चौकशी आयोगाविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकसदस्यीय चौकशी आयोगाविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चौकशी आयोगाने बजावलेल्या समन्सला सिंह यांनी आव्हान दिले आहे. तसेच सिंह यांनी आयोगाच्या चौकशीच्या व्याप्तीलाही आव्हान दिले आहे.के. यू. चांदीवाल यांच्या एकसदस्यीय चौकशी आयोगाला ज्याबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आले आहे, त्याबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आधीच फैसला सुनावलेला आहे, असे सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे.

उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आधीच निकाल दिल्याने आयोगाने चौकशी करण्यासारखे काहीही उरले नाही, असे म्हणत सिंह यांनी ही याचिका प्रलंबित असेपर्यंत आयोगापुढील कार्यवाहीला स्थगिती द्यावी व आपल्याला बजावण्यात आलेले समन्स रद्द करावे, अशी मागणीही केली आहे.२० मार्च २०२१ रोजी मी मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचारासंबंधी पत्र लिहिले होते. त्यानुसार देशमुख यांनी गुन्हा केला आहे की नाही, याची चौकशी करून तसा अहवाल सरकारपुढे सादर करायचा आहे, असे सिंग यांनी याचिकेत म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. कारण सकृतदर्शनी देशमुख यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. न्यायालयाने देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देताना म्हटले होते की, देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. यावरून स्पष्ट होते की उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असतानाही आयोगाच्या चौकशीची आवश्यकता काय? असा प्रश्न सिंह यांनी याचिकेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

सिंह यांना आयोगापुढे उपस्थित राहण्याची व जबाब नोंदवून त्यांची उलटतपासणी करण्याची आवश्यकता नाही, असे याचिकेत म्हटले आहे.आयोगाने सिंह यांना ६ ऑगस्ट रोजी आयोगापुढे जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्याकरिता समन्स बजावले आहे. तसेच त्यांना प्रतिज्ञापत्रही सादर करण्याचे आदेश दिले आहेत.सिंह यांनी या आदेशाला ३० जुलै रोजीच आयोगापुढे आव्हान दिले होते. मात्र, आयोगाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई हायकोर्ट