Join us  

मोठी बातमी : परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 10:37 AM

Parambir Singh News : अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे.  

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद गमवावे लागले आहे. दरम्यान, अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने (NIA) या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे.  (Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh arrives at the NIA office, in connection with the Antilia bomb scare case)

परमबीर सिंग हे आज सकाळी एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहे. तिथे ते जबाब नोंदवणार असून, अँटलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना  दिलेल्या विशेष अधिकारांबद्दल एनआयएकडून त्यांची चौकशी होणार आहे.  

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांच्या एका अहवालामुळेही परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सचिन वाझे पोलीस खात्यात पुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंकडे सोपवल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच महत्त्वाच्या प्रकरणात मंत्र्यांना ब्रिफिंग करताना सचिन वाझे हे परमबीर सिंग यांच्यासोबत असायचे अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचे प्रकरण तापल्यानंतर या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते. तसेच यादरम्यान मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याने हे प्रकरण अधिकच तापले होते. त्यातच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यावर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांना अखेर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

टॅग्स :परम बीर सिंगसचिन वाझेमुंबई पोलीसराष्ट्रीय तपास यंत्रणामहाराष्ट्र सरकार