पॅरासिटेमॉल, ॲस्पिरिन गोळ्या अपेक्षेप्रमाणे गुणकारी नाहीत; गुणवत्ता चाचणीतील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:02 IST2020-12-21T05:10:26+5:302020-12-21T07:02:34+5:30
Paracetamol, aspirin tablets : गुणवत्ता अपेक्षेनुसार नसल्याने अपेक्षेप्रमाणे ही औषधे गुणकारी नसल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे.

पॅरासिटेमॉल, ॲस्पिरिन गोळ्या अपेक्षेप्रमाणे गुणकारी नाहीत; गुणवत्ता चाचणीतील निष्कर्ष
मुंबई : हृदयरोगावर तातडीच्या उपचारासाठी वापरली जाणारी ॲस्पिरिन, तापावरील पॅरासिटेमॉल, डाएटवरील हिबस ५०, मधुमेहावरील रोझावास्टीन आदी १४ गोळ्यांची गुणवत्ता प्रमाणित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या औषधांचे उत्पादन व विक्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या मुंबई विभागाच्या गुणवत्ता चाचणीत हे स्पष्ट झाले आहे.
गुणवत्ता अपेक्षेनुसार नसल्याने अपेक्षेप्रमाणे ही औषधे गुणकारी नसल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने नोव्हेंबरमध्ये ७४६ औषधांची गुणवत्ता तपासली. त्यातील १४ टॅब्लेट्स गुणवत्तापूर्ण नसल्याचे समोर आले. त्यातील तीन टॅब्लेट्सची गुणवत्ता सीडीएससीओच्या मुंबई विभागाने तपासली. ॲस्पिरिन गाेळी तापासाठी वापरली जाते, हिबस ५० ही डाएटसाठी तर रोझावास्टीन मधुमेहासाठी वापरली जाते.
सीडीएससीओच्या मुंबई पश्चिम विभागाने रसलोय एएसपी १०-७५ (रोझावास्टीन अँड ॲस्पिरिन कॅप्सूल, पॅरासिटेमॉल टॅब्लेट आयपी ५०० एमजी, हेबस ५० (अकर्ब्स टॅब्लेट्स ५०० एमजी) या तीन टॅब्लेट्स ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ नोंदविण्यात आले आहे.
निर्णय घेण्याची गरज
ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे म्हणाले की, चाचणीच्या अहवालातून औषधांची गुणवत्ता समोर आली आहे, त्यानुसार औषधांच्या वापराबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.