कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या आता राजधानी एक्सप्रेसमध्ये मिळणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:12 IST2018-01-16T15:59:50+5:302018-01-16T16:12:10+5:30
राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना आता कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या मिळणार आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे. वर्तमानपत्रापासून कैद्यांनी तयार केलेल्या पिशव्या एक्सप्रेसमध्ये वापरण्याचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. यासाठी तिसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसवर या प्रकल्पाची चाचणी सुरुवातीला घेण्यात येणार आहे.

कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या आता राजधानी एक्सप्रेसमध्ये मिळणार !
मुंबई : राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना आता कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या मिळणार आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे. वर्तमानपत्रापासून कैद्यांनी तयार केलेल्या पिशव्या एक्सप्रेसमध्ये वापरण्याचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. यासाठी तिसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसवर या प्रकल्पाची चाचणी सुरुवातीला घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंदर भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक आणि येरवडा कारागृहातील कैदी रद्दीच्या वर्तमानपत्रापासून पिशव्या तयार करणार आहेत. या सर्व पिशव्या मशीनने बनवलेल्या इतर पिशव्यांपेक्षा अधिक मजबूत असणार आहेत. दरम्यान, यामुळे कारागृहातील कैद्यांनाही एकप्रकारे चांगल्या रोजगार मिळणार आहे.
सुरुवातीला 84,444 पिशव्या प्रारंभिक तत्वावर तयार करण्यात येणार आहेत. यापैकी प्रत्येक पिशवीची किंमत 2.28 रूपये असणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठ्या प्रमाणात या पिशव्या विकत घेतल्या तर त्याची किंमत ही थोडी कमी होणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ रेल्वे - स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून लागू करण्यात आला आहे.
सध्या या प्रकल्पासाठी येरवडा कारागृहातील 80 हून अधिक पुरूष कैदी तसेच काही महिला कैदीही कार्यरत आहेत. तसेच रद्दीच्या वर्तमानपत्रापासून पिशव्या बनवण्यासाठीच्या या कामासाठी सुमारे 2500 कैद्यांना कामावर घेण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे अधिकारी प्रशांत मत्ते यांनी दिली आहे. मुंबई, नाशिक आणि पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थांनी दिलेल्या रद्दीच्या वर्तमानपत्रापासून पिशव्या तयार करण्यात येणार आहे.