Join us  

जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 5:22 PM

भाजपाकडून पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर जाहीर झाली आहे.

मुंबई/बीड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका घेत भाजपाला राज्यातील ४८ जागांवरील एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा थेट इशारा दिला होता. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मराठा समाज बांधवांची व आंदोलकांची भूमिका जाहीर करण्यासाठी २४ मार्च रोजी बैठक आयोजित केली होती. त्यानुसार, राज्यभरातून आज अंतरवाली सराटी गावात लाखो मराठा बांधव बैठकीसाठी जमल्याचं दिसून आलं. या बैठकीत जरांगे यांनी भूमिका जाहीर केली असून प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचा एक उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर पंकजा मुडेंनी सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिली. 

भाजपाकडून पंकजा मुंडेंनाबीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर जाहीर झाली आहे. त्यानिमत्ताने त्यांनी बीड जिल्ह्यासह विविध भागात प्रचाराला सुरुवात केली असून दौरे सुरू आहेत. शनिवारी पंकजा मुंडेंचा ताफा जात असताना काही मुलांनी हातामध्ये काळी झेंडे धरून एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरुन जरांगे यांनी आजच्या बैठकीतून सरकावर निशाणा साधला. मात्र अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी पोलिसांकडे केली आहे. ती लहान मुले आहेत. केवळ झेंडे दाखवले म्हणून लहान मुलांवरती गुन्हे दाखल करू नका, अशी विनंतीच पंकजा यांनी पत्रातून पोलिसांना केली आहे. 

"बैठकीला उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाने आपआपल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घ्यावी आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत समाजातील लोकांचा काय विचार आहे, ते जाणून घ्यावं. लोकांचं काय मत आहे, ते मला पुढील चार दिवसांत लेखी आणून कळवा, त्यानंतर आपण अंतिम निर्णय घेऊ," अशी भूमिका मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत मांडली. प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, तत्पूर्वी तेथील मराठा बांधवांची चर्चा होणार आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी आपलं वैयक्तिक मतंही नोंदवलं आहे. "माझं तर म्हणणं आहे की, आपण लोकसभेच्या नादी न लागता विधानसभा निवडणुकीत यांना आपला हिसका दाखवून देऊ," असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. अत्यंत साधेपणातून उभे राहिलेले आंदोलन आणि त्यातून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत उभा राहणार नाही, हे सांगितले होते. जरांगे पाटील यांनी ते पुन्हा सिद्ध केले. शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार देणे न देणे हा त्यांचा विषय आहे, असे पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवर बोलताना म्हटले आहे. 

पंकजा मुंडे यांनी आज परळीतील गोपीनाथ गडावर येऊन वडिल कै. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच, लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ वडिलांच्या स्मृतीस्थळावर आशीर्वाद घेऊन पंकजा यांनी केला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडे हेही त्यांच्या स्वागताला परळीत हजर होते.  

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणपंकजा मुंडेबीड