Join us  

पंकजा मुंडे म्हणाल्या, भरुन पावले; वाढदिनी सांगितला परराज्यात आलेला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 2:35 PM

पंकजा मुंडेंचा आज वाढदिवस असून त्यांनी यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे त्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात नाहीत

मुंबई - गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाने मोठी ऑफर दिली होती. आपण कुठेही जाणार नाही, भाजपमध्येच राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यांनी स्पष्ट केले होते. अलीकडेच राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणाही पंकजा मुंडेंनी केली. त्यानुसार, पंकजा या गेल्या काही दिवसांपासून राजकीय कार्यक्रम आणि कामापासून दूरच आहेत. त्यात, आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

पंकजा मुंडेंचा आज वाढदिवस असून त्यांनी यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे त्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात नाहीत. तर, आपल्या वाढदिनी विशेष दर्शनासाठी त्या तिरुपती बालाजी मंदिरात गेल्या आहेत. मुलगा आर्यमन समवेत त्यांनी तिरुपती मंदिरात दर्शन घेतले. यावेळी, येथील दर्शनरांगेत आलेल्या सुखद अनुभवाचेही कथन केले. तसेच, देवाकडे तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत आहे, तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत आहेतच, असेही त्यांनी म्हटले. पंकजा यांनी मंदिरातील दर्शन घेतानाच्या फोटोंचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. 

कोटी कोटी धन्यवाद ...एक निवडणं शक्य नाही १० हजारांनीही भागणार नाही. किती जणांना भेटू आणि किती फोनवर बोलू. सर्वाना कनेक्ट नाही होणार, म्हणून नम्रपणे विनंती केली. वाढदिवसाचे सेलिब्रेशन नको, तुमचे एवढे सारे आशिर्वाद मिळाले. तिरुपती दर्शनातून... त्या राज्यात रांगेतील लोक "ताई "म्हणताना भरून आले ... मी भरून पावले ... असे ट्विट पकंजा यांनी केले आहे. पंकजा यांनी तिरुपती मंदिरातही ताई म्हणून रांगेतील भाविकांनी आवाज दिला, त्याचा मनस्वी आनंद झाल्याचं म्हटलं आहे. 

पंकजा मुंडेंना त्यांचे बंधू धनंजय मुंडे, भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच मध्य प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे निर्देश देण्यात आल्याचेही वृत्त यावेळी माध्यमांत होते. मात्र, पंकजा मुंडेंकडून याबाबत कुठलेही स्पष्टीकरण आले नाही.   

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपादेवेंद्र फडणवीसतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट