Join us  

'पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे उद्या गोपीनाथ गडावर योग्य तो निर्णय घेतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:46 AM

ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचं खडसेंनी वारंवार पक्षनेतृत्वाकडे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई - गेल्या काही वर्षापासून भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना डावलवण्याचा काम केलं जातं असून त्याचा साक्षीदार मी स्वत: आहे. सध्या भाजपाचे नेते एकनाथ खडसेंनी नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे. ४० वर्ष पक्षासाठी देऊन सुद्धा भाजपाने त्यांचा अपमान केला आहे असं सांगत उद्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे योग्य निर्णय घेतील असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला आहे. 

टीव्ही ९ मराठीशी बोलताना प्रकाश शेंडगे यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षात पंकजा मुंडे यांना भाजपाने डावललं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याची मुलगी तिला सातव्या स्थानावर फेकण्यात आलं. त्याजागी चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसऱ्यास्थानी आणलं. यापुढे जात निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करण्याचंही काम भाजपा नेत्यांनी केलं असं खडसेंनी खुलासा केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेही नाराज आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच एकनाथ खडसे यांच्याबाबतीतही इतकी वर्ष पक्षासाठी काम करुन त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करुन घेतले जात नाही. यंदाच्या निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं, त्यांच्या मुलीला तिकीट देऊनही त्या जागेवर तिचा पराभव केला गेला. ओबीसी नेत्यांची अवहेलना भाजपाकडून सुरु आहे. त्यामुळे ही ओबीसी नेत्यांची परवड थांबण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. 

दरम्यान, ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचं खडसेंनी वारंवार पक्षनेतृत्वाकडे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे दिल्लीत गेले असता भाजपाच्या वरिष्ठांनी भेट न दिल्यानं ते थेट शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत तर जाणार नाहीत ना, अशी चर्चाही सुरू झाली. पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर खडसे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी विधान भवनात दाखल झाले. शरद पवार, पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं खडसेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाहीये. तसेच पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीतही पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे गैरहजर राहिले त्यामुळे उद्या होणाऱ्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.     

टॅग्स :पंकजा मुंडेएकनाथ खडसेभाजपाप्रकाश शेंडगेअन्य मागासवर्गीय जाती