कराची ते नेपाळ आणि मग मुंबई…पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भावाची मायदेशी जाण्यासाठी ५ वर्षांपासून धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:57 IST2025-02-20T17:51:01+5:302025-02-20T17:57:58+5:30

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भाऊ गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत मदतीच्या प्रतीक्षेत फिरत असल्याचे समोर आलं आहे.

Pakistani citizen Nadir Karim Khan awaits extradition to Pakistan | कराची ते नेपाळ आणि मग मुंबई…पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भावाची मायदेशी जाण्यासाठी ५ वर्षांपासून धडपड

कराची ते नेपाळ आणि मग मुंबई…पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भावाची मायदेशी जाण्यासाठी ५ वर्षांपासून धडपड

Pakistan National Nadir Khan:पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भाऊ गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत मदतीच्या प्रतीक्षेत फिरत असल्याचे समोर आलं आहे. व्यापारासाठी नेपाळमध्ये गेल्यानंतर तिथे फसवणूक झाल्याने पाकिस्तानी नागरिक भारतात आला होता. मात्र अनधिकृतपणे भारतात आल्याने या पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांनी अटक केली होती. सहा महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूचा भाऊ बाहेर आला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानात प्रत्यार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या या पाकिस्तानी नागरिकाच्या पदरी अजूनपर्यंत निराशाच पडली आहे.  त्यामुळे आता या पाकिस्तानी नागरिकाला मुंबईच्या रस्त्यांवर फिरावं लागत आहे.

मुंबईतील नेहमी गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्याजवळ फिरणाऱ्या ६५ वर्षीय पाकिस्तानी नागरिक नादिर करीम खान यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला आहे. नादिर खान यांना अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता नादिर करीम खान हे त्यांच्या देशात परत जाण्यासाठी वाट बघत आहेत. २०२१ मध्ये नादिर खान त्यांच्या कुटुंबाला शेवटचे भेटले होता. तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते क्रॉफर्ड मार्केट परिसरात एकटेच बसून असतात. रात्र पडली की पोलीस ठाण्यातील रिकाम्या जागेत झोपतात. घरचा विचार करुन मला अनेकदा झोप येत नाही, असं नादिर खान यांचे म्हणणं आहे.  

भाऊ अमेरिकेत नादीर खान मुंबईत अडकून

नादिर खान हे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू अन्वर खान यांचा लहान भाऊ आहेत. अन्वर खान यांनी १९७९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. सध्या ते कुटुंबसह अमेरिकेत स्थायिक झालेत तर त्यांचा लहान भाऊ नादीर खान हे मदतीसाठी भटकत आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कराचीत कापडाचा व्यापार करणारे नादिर करीम खान नेपाळच्या काठमांडू येथे व्यवसायाच्या निमित्ताने गेले होते. मात्र स्थानिक विक्रेत्यांनी त्यांची फसवणूक केली होती. नेपाळमधील विक्रेत्यांनी त्याला तीन हजार लेदर जॅकेट्सची ऑर्डर दिली पण त्या वस्तूच्या बदल्यात त्यांना पैसे दिले नाही.

नेपाळमध्ये १००० डॉलरचा दंड

विक्रेत्यांनी नादीर यांना चेक दिला होता पण तो बाऊन्स झाला. पैसे मिळतील या आशेने नादीर खान २२ महिने नेपाळमध्ये राहिले. नेपाळ पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असताना विक्रेत्यांनी नादीर खान यांना मारहाण करुन त्यांचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे चोरली. त्यानंतर नेपाळ पोलिसांनी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ तिथे राहिल्याने १००० डॉलरचा दंड ठोठावला. दंड भरण्यासाठी पैसे नसल्याने ते सनौलीमार्गे भारतात आले. यानंतर त्यांनी गोरखपूरहून नवी दिल्लीला जाण्यासाठी ट्रेन पकडली, तिथे त्याने पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क साधला. पण पाकिस्तानी दूतावासाने त्यांचे ऐकले नाही.

मुंबई पोलिसांकडून चौकशी

त्यानंतर नादीर खान यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. १ नोव्हेंबर २०२३ रोजी नादिर करीम खान दादर रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे त्यांनी टॅक्सी करुन सीएसएमटी येथील पोलीस उपायुक्तांचे कार्यालय गाठले. त्यानंतर नादिर खान यांना अनेक महिने माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. तिथे तपास यंत्रणांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर गेल्या वर्षी ११ एप्रिल रोजी पोलिसांनी त्यांना भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली. ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्यांन सहा महिन्यांचा कारावास आणि ५०० ​​रुपये दंड ठोठावला.

दोन वर्षांपूर्वी कुटुंबाशी साधला शेवटचा संपर्क

नादिर खान ११ ऑक्टोबर रोजी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले, तेव्हापासून तो एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात आहेत. पोलिसांनी नादिर खान यांना हद्दपार होईपर्यंत पोलीस स्टेशन परिसर सोडू शकत नाही, अशी सूचना केली आहे. पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून पाकिस्तानसोबत हद्दपारीसाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. वरिष्ठांच्या सूचनेमुळे नादिर याना कराचीतील त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नादिर खान यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांच्या कुटुंबाला फोन करुन आपण सुरक्षित असून मुंबई पोलिसांकडे असल्याचे सांगितले होते.

Web Title: Pakistani citizen Nadir Karim Khan awaits extradition to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.