Join us  

सावधान! दहशत पसरविण्यासाठी पाकिस्तानकडून होऊ शकतो तुमचाही वापर; पोलीस सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 10:01 PM

शनिवारी महाराष्ट्र पोलीस सायबर सेलचे आयजी ब्रिजेश सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई - कलम 370 हटविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हताश झालेल्या पाकिस्तानकडून विविध मार्गातून भारताविरोधात षडयंत्र रचणं सुरूच आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आता सोशल मीडियाचा वापर करत काश्मीरमधील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून फेक व्हिडीओ शेअर केले जात असल्याचं निर्दशनास आलं आहे. 

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतीय नावांवर फेक आयडी बनविले असून त्यात काश्मीरबाबत बनावट फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जातात. अशा माध्यमातून काश्मीर खोऱ्यातील शांतात बिघडविण्यासाठी अफवा पसरविल्या जात आहेत. 

शनिवारी महाराष्ट्र पोलीस सायबर सेलचे आयजी ब्रिजेश सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानी लोकांकडून भारतीयांच्या नावावर फेक आयडी बनविले जातात. या सर्व अकाऊंटवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या जातात. त्याचसोबत बनावट फोटो आणि व्हिडीओ ज्यामाध्यमातून काश्मीरमधील चुकीची माहिती पसरविली जाते. तसेच याप्रकारचे व्हिडीओ अनेक अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट केल्या जातात असं त्यांनी सांगतिले. 

लोकांनी कोणत्याही प्रकारे अशा अफवांना बळी पडू नये. ज्यामुळे भारतीय जवानांची आणि सुरक्षा यंत्रणांची चुकीची प्रतिमा लोकांमध्ये पसरली जाईल. हे वादग्रस्त पोस्ट जाणूनबुजून पसरविल्या जात आहेत. कोणतीही खातरजमा न करता अशाप्रकारे पोस्ट फॉरवर्ड करू नका असं आवाहन ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवरून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरसह देशातील अनेक भागात असे अकाऊंट बंद करण्याचं काम सुरू आहे. ज्यामुळे काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडू शकेल.  

टॅग्स :भारतपाकिस्तानसोशल मीडिया