Lalbaugcha Raja 2025: अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पार पडला. गणेश मुहूर्त पूजनासोबत पार पडलेल्या या सोहळ्याचा फोटो समोर आला आहे. यावर्षी लालबागचा राजाचागणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ ते अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. याही वर्षी लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन शनिवारी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत पार पडला. यावेळी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या हस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.
खऱ्या अर्थाने मुंबईतल्या गणेशोत्सवाची सुरुवात लालबागच्या राजाच्या पाद्यपुजनाने होते. गणेशोत्सवाला काही दिवस उरलेले असताना संकष्टीच्या मुहूर्तावर हा पाद्यपूजन सोहळा पार पडायचा. याआधी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळा हा आकर्षणाचा विषय होता या पाद्यपूजन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत होते. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून लालबागचा राजा मंडळाने हा पाद्यपूजन सोहळा मूर्तीकाराच्या कार्यशाळेत अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संकष्टीच्या मुहूर्तावर शनिवारी मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूर्तीकार संतोष कांबळी यांच्या कार्यशाळेत लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळा पार पडला.
लालबागचा राजा या गणपतीची ख्याती जगभरात आहे. विशेष म्हणजे या गणपतीच्या मंडळाचा आगमन सोहळा नसतो. या मूर्तीची ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली जाते त्याच ठिकाणी घडवली जाते. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असतानाच मुंबईत मंडळांची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे झाडून तयारीला लागली आहेत. पण मुंबईतील नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याने गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.