Join us
Daily Top 2Weekly Top 5

पी-३०५ बार्जचा अपघात: चिंता, हुरहुर अन् अश्रू; आप्तांना शाेधण्यासाठी कुटुंबीयांची शवागृहाबाहेर गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 09:58 IST

बुधवारपासून ते गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ३६ मृतदेह रुग्णालयातील शवागृहात आणल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.

मुंबई : तौक्ते वादळाच्या तडाख्यानंतर बॉम्बे हायनजीक ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील २६१ कर्मचाऱ्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवरक्षक जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या… आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या सुटकेचा थरार... आपल्या कुटुंबीयातील व्यक्तींच्या जिवासाठी होणारी घालमेल... अथांग समुद्रात प्रत्येक श्वासासाठी लढणारे कर्मचारी... अशी काळजाचा ठाव घेणारी स्थिती निर्माण झाली.     पी-३०५ तराफा बुडाल्यानंतर या घटनेतील मृतदेह जे. जे. रुग्णालय शवागृहात ठेवण्यात आले.  

बुधवारपासून ते गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ३६ मृतदेह रुग्णालयातील शवागृहात आणल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. यानंतर तराफ्यावर कर्तव्यावर असणाऱ्यांच्या काळजीने जे. जे. रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तराफ्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी कुटुंबीय अहोरात्र धडपड करत होते. मात्र रात्रीचा दिवस उजाडूनही अनेकांशी संपर्क होऊ शकला नव्हता. अशा वेळेस या कुटुंबीयांनी घाबरून नौदल कक्ष आणि रुग्णालयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 

अखेर, बुधवारी सकाळपासून जे. जे. रुग्णालय शवागराबाहेर ते अश्रूंना आवरत मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी जमा झाले होते. प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती. आपल्या कुटुंबीयातील सदस्य सुरक्षित असावा, अशी प्रार्थना करत ते देवाचा धावा करत हाेते. काही माऊलींचा जीव कंठाशी आला हाेता. त्यांनी तर हंबरडाच फाेडला.  शवागृहातबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव असणारे पोलीस दलातील कर्मचारीही कुटुंबीयांना धीर देताना दिसत होते.

३८ एडीआर दाखलबार्ज पी - ३०५ वरील ३८ जणांच्या मृत्यूप्रकरणी यलोगेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.  चक्रीवादळामुळे ओएनजीसीसाठी काम करणारे बार्ज पी - ३०५ समुद्रात भरकटले. यात ३८ मृत्यूप्रकरणी यलोगेट पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली. 

आतापर्यंत ओळख पटलेल्यांची नावेनीलेश प्रकाश पितळे (वय ४५),  जोमीश जोसेफ (३५), अमलराज बर्नाबस (४३), विशाल वसंत काठदरे (३५), नवीन कुमार (२९), गोलेख चंद्रा साहू (५२), ससिन इस्माईल (२८), सुशील कुमार (२३), प्रमोद पाठक (४५), मनप्रीत बलवंत सिंह (२६), पप्पुराम उदाराम (३२), योगेश गिर गोसावी, अजहर युनुस गडी (२५), मोहन वामसी कृष्णा (३३), अजय शिवप्रसाद सिंग (३९)

टॅग्स :तौत्के चक्रीवादळभारतीय नौदल