मुंबई : गजबजलेले व दाटीवाटीचे प्रमुख विभाग दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचे केंद्र बनले होते. यापैकी काही ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने धोका व्यक्त होत होता. वांद्र्यामध्ये तर झोपडपट्ट्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याची वेळ आली होती. मात्र जास्तीत जास्त रुग्णांची चाचणी, प्रभावी विलगीकरण आणि तात्काळ उपचार यामुळे हे विभाग आता कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी वांद्रे पूर्व एच पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८८ दिवसांवर गेला आहे. त्यापाठोपाठ सायन-माटुंगा, भायखळा -नागपाडा आणि कुर्ला विभागातही तब्बल अडीच महिन्यानंतर रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर वरळी विभाग हा सर्वप्रथम हॉटस्पॉट बनला होता. त्यापाठोपाठ धारावी, भायखळा, सायन-माटुंगा, वांद्रे पूर्व, कुर्ला, चेंबूर या विभागांतही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. त्यातच या विभागांमध्ये दाटीवाटीची वस्ती असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवणे आव्हान ठरत होते. भायखळा येथील रुग्णसंख्या वाढ असल्याने ई विभागाच्या सहायक आयुक्तांची बदली करण्यात आली होती. रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्यामुळे या विभागांमध्ये तणावाचे वातावरण होते.मात्र येथील दाटीवाटीच्या वस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग अवघड बनले होते. अखेर कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील लोकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तसेच पालिकेच्या ‘चेस द व्हायरस’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक रुग्णामागे १५ लोकांना क्वारंटाइन करण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर निर्जंतुकीकरण मोहीम प्रभावी करण्यात आली. परिणामी, या विभागांमधील रुग्णवाढीची आठवड्याची सरासरी एक टक्क्यावर आली आहे.एच पूर्व विभाग म्हणजेच सांताक्रुझ, खार, वांद्रे पूर्व येथील सरासरी वाढ सर्वात कमी म्हणजे ०.८ टक्के आहे. तर भायखळा ई विभाग आणि एफ उत्तर सायन-माटुंगा- ०.९ तर कुर्ला विभागची सरासरी वाढ १ टक्क्यावर आली आहे.* वरळी आणि धारावी विभागात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५५ दिवसांचा आहे.
CoronaVirus News : हॉटस्पॉटमध्ये कोरोनावर मात, वांद्र्यात रुग्ण दुपटीचे प्रमाण ८८ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 01:31 IST