लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचा परिणाम मुंबईवर झाला आहे. या हवेतील आर्द्रतेमुळे शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ हवामान नोंदविण्यात आले. शनिवारी थोड्याफार फरकाने मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ हवामान राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली असून, याचा परिणाम म्हणून तापमानात वाढ झाली आहे आणि थंडी पळाली आहे.
हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, विदर्भवगळता राज्यात शनिवारी ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात हा परिणाम जाणवेल. राज्यात कमाल तापमान ३३, तर किमान तापमान २१ दरम्यान असून, ही दोन्ही तापमाने जवळपास सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक आहेत.
१७ नोव्हेंबरपासून थंडीची स्थिती पूर्ववतदक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाच्या परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात १६ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे. १७ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू थंडीची स्थिती पूर्ववत होईल. मुंबईसह कोकणातही त्यामुळे ढगाळ वातावरण निवळेल.