Join us
Daily Top 2Weekly Top 5

३०० पेक्षा जास्त कलाकार उलगडणार महाकाव्य रामायणातील प्रसंग; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 12:30 IST

३१ जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे महाकाव्य रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण

मुंबई: देशभरासह अवघ्या विश्वातील नागरिकांच्या मनाला भावणाऱ्या महाकाव्य रामायणातील विविध प्रसंगांचे प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण असलेला आणि गीत, नृत्य, नाट्य, गायन, वादन यामधून रामायण महाकाव्यातील प्रसंग जागविणारा कार्यक्रम बुधवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी सात वाजता सादर केला जाणार आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमात दूरचित्रवाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेतील काही कलाकारांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी सायंकाळी ७ ते ९.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. 

महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि स्व. सुधीर फडके (बाबूजी) यांच्या आवाजातून अजरामर झालेल्या गीतरामायणातील विविध प्रसंगांतील गीतांचे सादरीकरण पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या नृत्य, नाट्य, आणि वादनातून अनुभवता येणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. या महाकाव्य रामायण सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर, सीतामाईच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत शुभंकर परांजपे हे सादरीकरण करणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून त्यासाठीच्या सन्मानिका मुंबईतील विविध नाट्यगृहे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य विभाग येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवाररामायणमहाराष्ट्र सरकार