मुंबईतील रस्त्यांवरून कुटुंब व्यवस्थेला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाला मुलांनी बेवारस स्थितीत रस्त्यावर सोडलं. हा वृद्ध बाप असहाय अवस्थेत अन्नपाण्याविना तडफडताना दिसून आला. आपले दोन मुलगे असून, त्यापैकी एक जण मागच्या चार वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. तर दुसरा मुलगा वकील आहे, अशी माहिती या वृद्धाने दिली. दोन्ही मुलं काहीच मदत करत नसल्याने आपल्याला रस्त्यावर राहावे लागत आहे, अशी व्यथा या वृद्धाने मांडली. मुंबईतील धारावी परिसरात समोर आलेल्या या प्रकारामुळे लोकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, सुदैवाने एका एनजीओची नजर या वृद्ध व्यक्तीवर पडली. या एनजीओने या वृद्धाला आधार दिला. त्यांना आंघोळ घालून नवे कपडे दिले. तसेच राहण्यासाठी जागाही दिली. आता या एनजीओने असहाय वृद्धाच्या मदतीसाठी उचललेल्या पावलाचं कौतुक होत आहे. जेव्हा या वृद्धाबाबतची माहिती लोकांना कळली, तेव्हा या वृद्धाच्या मुलांवर लोक संतप्त झाले. ज्या आई-वडिलांनी मुलांसाठी संपूर्ण आयुष्य घालवलं, तेच आज असहाय स्थितीत रस्त्यावर आहेत, ही बाब खूप लाजिरवाणी आहे, असे लोक म्हणाले.
दुसरीकडे कठीण काळात या वृद्धाला मदत करणाऱ्या एनजीओचे लोक आभार मानत आहेत. तर वडिलांची काळजी न घेणाऱ्या मुलांना समाजासाठी डाग म्हटलं जात आहे. जे लोक आपल्या वडिलांसोबत असं वागतात, त्यांच्यासोबतही एक दिवस असंच होईल, असा शापही लोक देत आहेत.