Join us

आक्रोश, हंबरडा आणि संताप; घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार, अनेकांचा कंट दाटला

By गौरी टेंबकर | Updated: February 10, 2024 07:22 IST

शोकाकूल वातावरणात अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार

गाैरी टेंबकर- कलगुटकरमुंबई : दहिसरमधील माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक यांच्यावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. ‘अमर रहे अमर रहे अभिषेक घोसाळकर अमर रहे’, अशा घोषणा उपस्थितांनी यावेळी दिल्या. 

फेसबुक लाइव्ह कार्यक्रमादरम्यान मॉरिस नरोन्हा याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात जबर जखमी झालेल्या अभिषेक यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. मारेकरी मॉरिस यानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. हे वृत्त वाऱ्यासारखे वेगाने पसरले. शुक्रवारी सकाळी अभिषेक यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची रांग लागली. त्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी पालकमंत्री व आमदार आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, अनिल परब, खासदार संजय राऊत यांचा समावेश होता. त्यांनी घोसाळकर कुुटुंबीयांचे सांत्वन केले. अंत्ययात्रेला परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. हत्येच्या निषेधार्थ बोरिवली फाटक आणि दौलतनगरमध्ये सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

ख्रिसमसमध्ये समेट अन्... मॉरिस नरोन्हा याने गेल्या वर्षी ख्रिसमसदरम्यान अभिषेक यांच्याशी समेट केला होता. आयसी कॉलनी परिसरातील गरिबांना संसारोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम मॉरिसने आखला होता. त्यासाठी त्याने अभिषेक यांना त्याच्या कार्यालयात बोलावले होते. यावेळी फेसबुक लाइव्ह दरम्यानच मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. ख्रिसमसमध्ये मैत्री झाल्यानंतर विश्वासघाताने अभिषेक यांची हत्या केल्याचा आरोप संतप्त कार्यकर्ते अंत्ययात्रेत करत होते.  दरम्यान, गुरुवारी मॉरिसने अभिषेक यांची हत्या केल्याचे समजताच संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. सोशल मीडियावर हत्येचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.  मात्र, मॉरिसने स्वत: आत्महत्या केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शुक्रवारी परिमंडळ १२ च्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पूर्व परिसरात योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अधुरे अभिषेक आणि त्यांच्या पत्नी तेजस्वी यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस १४ फेब्रुवारीला होता. दरवर्षी हे दाम्पत्य मुलांना घेऊन यानिमित्ताने बाहेरगावी फिरायला जायचे. यावर्षीही त्यांनी मनालीला जाऊन लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करायचे ठरवले होते. मात्र, तत्पूर्वीच अभिषेक यांची निर्घृण हत्या झाली. पतीचा मृतदेह पाहताच तेजस्विनी यांनी हंबरडा फोडला. वडील विनोद घोसाळकर या घटनेने सुन्न झाले होते. संपूर्ण घोसाळकर कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.

 सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजलीअभिषेक यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ठाकरे गटाबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी गर्दी केली. त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, अजय चौधरी, संजय पोतनीस, विलास पोतनीस, सुनील प्रभू, सुनील शिंदे, रमेश कोरगावकर, प्रकाश फातरपेकर, काँग्रेसचे भाई जगताप, सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे प्रवीण दरेकर, युवा सेनेचे वरुण सरदेसाई, अमोल कीर्तिकर, अंकित प्रभू, माजी नगरसेवक संजय घाडी, विशाखा राऊत, संजना घाडी, बाळकृष्ण ब्रिद, सदानंद परब, विभाग प्रमुख उदेश पाटेकर, सुजाता शिंगाडे, शीतल शेठ-देवरूखकर, राखी जाधव, जितेंद्र आव्हाड, मिलिंद वैद्य, उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार राजन विचारे, विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई हे उपस्थित होते.

टॅग्स :अभिषेक घोसाळकरगुन्हेगारीपोलिस