Join us

"तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केलीय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 09:11 IST

अशा पाडकामावर तर तुमची एकाधिकारशाही आहे तुमच्या एकेकाळच्या तीन खांबी सर्कशीचा एक टेकू राहिलेल्या खुद्द उद्धव ठाकरेंनीच म्हटले होते

मुंबई - केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर ससंदेत चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी मोदी सरकावर जोरदार हल्ला चढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर घणाघाती टीका केली. भाजपाने गेल्या ९ वर्षांत ९ सरकारे पाडल्याचा आरोप करत फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका केली. सुप्रिया सुळेंचं हे भाषण महाराष्ट्रातही चांगलच चर्तेत आहे. त्यावरुन, आता भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे.  

चित्रा वाघ यांनी सोशल मीडियातून सुप्रिया सुळेंवर टीका करताना म्हटले की, ''अशा पाडकामावर तर तुमची एकाधिकारशाही आहे तुमच्या एकेकाळच्या तीन खांबी सर्कशीचा एक टेकू राहिलेल्या खुद्द उद्धव ठाकरेंनीच म्हटले होते की, कमीत कमी आमदारांत सरकार बनवायचं कसब आम्ही शरद पवारांकडून शिकलोय. अगदी तुम्हीही म्हणाल्या होतात, राष्ट्रवादीचा सत्तेत राहण्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे. तुमच्या पक्षाच्या जन्मापासूनच तुम्ही सत्तेत आहात. पण, तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केली आणि तुमची अनैसर्गिक आघाडीची सत्ता उध्वस्त झाली,'' अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेवर पलटवार केला आहे.  

महाभकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर आता तुम्ही आम्हाला शिकवताय. पण, परिवारासाठी सत्तेला चिकटून राहणं आणि देशाच्या विकासासाठी सत्तेला केवळ साधन मानून काम करणं, हा तुमच्या-आमच्यातला फरक आहे….तो तेव्हढा लक्षात घ्या, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली, मग कसं सहन करायचं?, मोदी सरकारला काहीच वाटत नाही?, त्या भारताच्या मुली नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

निशिकांत दुबेनी करुन दिली आठवण

भाजपाकडून सुप्रिया सुळेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी इतिहासाची आठवण करून देत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. निशिकांत दुबे म्हणाले की, सुप्रिया सुळे खूप बोलत होत्या. म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं होतं. हो म्हटलं होतं. पंतप्रधानांनी म्हटलं होतं. भाजपाही म्हणतो. आम्ही असं म्हणत असतो. मी थोडं इतिहासात डोकावून पाहिलं, की १९८० मध्ये शरद पवार यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं. आम्ही तर नाही केलं? या काँग्रेस पक्षानं बरखास्त केलं. शरद पवार यांनी कुठल्या आधारावर एक वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला होता. आम्ही तर वेगळा पक्ष बनवायला सांगितला नव्हता. 

टॅग्स :सुप्रिया सुळेभाजपामणिपूर हिंसाचारचित्रा वाघ