Rutuja Latke: आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच, CM शिंदेंना भेटले नाही; ऋतुजा लटकेंनी स्पष्टचं सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:36 IST2022-10-12T14:35:25+5:302022-10-12T14:36:25+5:30
लटके कुटुंबीयांची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच असून माझ्यावर कोणताही दबाव नाही. तसंच अंधेरीची पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरच लढवणार, असं दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं आहे.

Rutuja Latke: आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच, CM शिंदेंना भेटले नाही; ऋतुजा लटकेंनी स्पष्टचं सांगितलं!
मुंबई-
लटके कुटुंबीयांची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच असून माझ्यावर कोणताही दबाव नाही. तसंच अंधेरीची पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरच लढवणार, असं दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं आहे. त्या मुंबई मनपा कार्यालयात महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या असताना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. पोटनिवडणुकीला उभं राहण्यासाठी ऋतुजा लटके यांनी आपल्या पालिका कर्मचारी पदाचा राजीनामा दिला आहे. पण तो अद्याप मंजूर न झाल्यानं आज त्या पालिका आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचल्या.
ऋतुजा लटकेंवर शिंदे गटाचा दबाव, राजीनामा मुद्दाम रखडवला; ठाकरे गटाची कोर्टात धाव!
ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. याबाबत ऋतुजा यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्यावर कोणताही दबाव नाही. तसंच मला कोणतीही ऑफर नाही. मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि मी निवडणूक मशाल चिन्हावरच लढणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी राजीनामा मंजूर होण्यासाठी पालिका कार्यालयात येत आहे. तुमची सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. फक्त सही बाकी आहे असं सांगण्यात येत आहे. आज मी महापालिका आयुक्तांना भेटत आहे. त्यानंतर सविस्तर माहिती मिळू शकेल", असं ऋतुजा लटके म्हणाल्या. तसंच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचंही वृत्त ऋतुजा लटके यांनी यावेळी फेटाळून लावलं आहे.
मशाल चिन्हावरच लढणार
"माझे पती आणि आमचं कुटुंब ठाकरे कुटुंबाशीच एकनिष्ठ राहिलं आहे. त्यामुळे मी मशाल चिन्हावरच निवडणूक लढणार आहे. मला कोणतीही मंत्रिपदाची किंवा कसलीही ऑफर कुठूनही आलेली नाही. तसंच माझ्यावर कोणताही दबाव नाही", असं ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं.