आमच्या जिवाची किंमत नाही का? कुठे वीट पडते, कुठे लोखंडी अँगल; पोलिसांची फक्त नावाला कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:34 IST2025-11-06T12:33:40+5:302025-11-06T12:34:55+5:30
मोठी दुर्घटना झाल्यावरच दखल घेणार का? मुंबईकरांचा सवाल

आमच्या जिवाची किंमत नाही का? कुठे वीट पडते, कुठे लोखंडी अँगल; पोलिसांची फक्त नावाला कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माया नगरी मुंबईत उंचच उंच टॉवर आकाशाला भिडत असताना, काही ठिकाणी मात्र सुरक्षेचा प्रश्न अधांतरी राहिल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. जोगेश्वरीत बांधकामाधीन इमारतीवरून पडलेल्या विटेने एका नोकरदार तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर भांडुपमध्ये एका कामगाराने आपला जीव गमावला. या घटनांनंतर मुलुंडमध्ये लोहिटिका या बांधकामाविरुद्ध स्टॉप वर्क नोटीस देत गुन्हाही नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रहिवाशांच्या घरांवर पडणारे दगड, खडी थांबवण्यासाठी जाळी बसवण्याचा मुहूर्त लागला, पण अद्यापही आजूबाजूला असलेल्या सायकल ट्रॅक किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना दिसत नाही. प्रशासन मात्र गुन्हा नोंदवून थांबते. पुढे काय, हे कुणालाच ठाऊक नाही. अखेर, मृतांच्या कुटुंबीयांकडून आमच्या जिवाची किंमत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुलुंड टी वार्डमधील सब इंजिनीअर रणजीत बोंगाणे (३४) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. मुलुंड पश्चिमेकडे लोहिटीका प्रापर्टीज एलएलपी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामालगतच वीर संभाजीनगर पाइपलाइन भागात चाळ आहे. गेल्या काही दिवसांपासून इमारतीची खडी थेट चाळीच्या दिशेने पडत होती. तसेच, याच दिशेने पालिकेने सायकल ट्रॅकदेखील बनविला आहे. यावरून लहान मुलांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. याबाबत तक्रार करताच पालिकेने घटनास्थळी धाव घेतली.
इमारतीच्या बाजूला सुरक्षितेसाठी लावण्यात येणारे ३५ फुटी उंचीचे पत्राचे कपांउड न लावता फक्त १५-२० फूट उंचीचे लावलेले होते. जिवीताला पोहोचण्याच्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा सुरक्षा साधनाचा बंदोबस्त केला नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी १८ सप्टेंबर रोजी नोटीस बजावली. अखेर त्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे. याबाबत पालिका अधिकारी रणजीत बोंगाणे यांच्याकडे विचारणा करताच त्यांनी संबंधिताला स्टॉप वर्क नोटीस बजावत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई पोलिस करत असल्याचे सांगितले. मात्र, सुरक्षेसंबंधित अद्यापही पूर्तता न करता देखील काम जोमाने सुरू असल्याचे दिसले. मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा नोंदवत संबंधित कंत्राटदाराला ताब्यात घेत नोटीस बजावत कारवाई केल्याचे सांगितले.
मोठी दुर्घटना झाल्यावरच दखल घेणार का?
स्टॉप वर्क नोटीस बाजावून देखील जोमाने काम सुरू आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच प्रशासन गंभीर दखल घेणार का? असा सवालही याप्रकरणी आवाज उठवणारे गजेंद्र पिपाडा यांनी केला.
यापूर्वीच्या घटना
नोकरदार तरुणीचा बळी
८ ऑक्टोबर - जोगेश्वरी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून वीट पडल्याने २२ वर्षीय संस्कृती अमीन नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. ती कामावर जात होती. या घटनेनंतर, पोलिसांनी बांधकाम विकासक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवत दोन अभियंत्यांना अटक केली.
१८ ऑक्टोबर - भांडुप येथील श्रद्धा क्लासिक बांधकाम साइटवर काम करत असताना, लिफ्टच्या वॉल्वला बसवलेल्या कठड्याचा एक लोखंडी अँगल अचानक सुटून डोक्यावर पडल्याने मिथुन राजवली केवट (१९) या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी खोडाल इंटरप्रायजेसचे मालक निर्दोश रमेश पटेल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.
४२ व्या मजल्यावरून पडली वीट
फेब्रुवारी २०२३ - मुंबईच्या वरळी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून मोठी विट पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. इम्रान आणि शब्बीर असे मृतांचे नाव असून, ते एक्सपोर्ट कंपनीत काम करत होते. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली.