‘आपट्याची पाने’ हेच आमच्यासाठी खरे ‘सोने’!; ग्रामीण भागातील महिला विक्रेत्यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 13:17 IST2025-10-02T13:16:36+5:302025-10-02T13:17:04+5:30
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दादरच्या फुलांच्या मार्केटमध्ये आपट्याच्या पानांचाही बाजार बहरल्याचे पाहायला मिळाले.

‘आपट्याची पाने’ हेच आमच्यासाठी खरे ‘सोने’!; ग्रामीण भागातील महिला विक्रेत्यांची भावना
मुंबई : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दादरच्या फुलांच्या मार्केटमध्ये आपट्याच्या पानांचाही बाजार बहरल्याचे पाहायला मिळाले. ग्रामीण भागांतील महिला पहाटेपासूनच ही पाने विक्रीसाठी घेऊन आल्या होत्या. छोटी जुडी १० ते १५ रुपयांपासून त्या विकत होत्या. दसरा हा आमच्यासाठी सोन्याचाच दिवस असतो. ‘आपट्याची पाने’ हेच आमच्यासाठी खरे ‘सोने’ आहे. या पानांच्या विक्रीतून दोन पैसे मिळाल्याने गोडधोड भोजनाचा आस्वाद घेता येतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासूनच सोन्याला फार किंमत आहे, सोने सगळ्यांनाच परवडणारे नव्हते. त्यामुळे सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने देण्याची परंपरा आजही आहे. श्री रामाने लंकेवर विजय मिळविल्यानंतर अयोध्येत परतताना नागरिकांनी सोन्याऐवजी आपट्याची पाने अर्पण केली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे ही पाने विजय, ऐश्वर्य व शुभत्वाचे प्रतीक मानली जातात.
कर्जत, कसारा, पालघर, मावळ, इगतपुरी, भुसावळ येथील आदिवासी भागातून शेकडो महिला दसऱ्याच्या एक दिवस आधी दादरमध्ये येतात. अनेकदा उपाशीपोटी, पावसापाण्यात, रेल्वे पुलावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ पोटासाठी त्या दिवस व्यवसाय करतात.
१० ते १५ रुपये प्रति जुडी
बुधवारी आपट्याच्या पानाची एक जुडी १० ते १५ रु. दराने विकली गेली. दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी मागणी वाढल्यास हा भाव २०-२५ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक जुडीत सुमारे २०-२५ पाने असतात. या पानांच्या विक्रीतून दादर येथील बाजारात दोन ते तीन दिवसांत साधारणत: ७० हजार ते एक लाखापर्यंत उलाढाल होते, असे जाणकारांनी सांगितले.
दुर्वा, जास्वंदीलाही मागणी
मार्केटमध्ये आपट्याच्या पानांसह दुर्वा, बेल, जास्वंदी, शेवंती आणि मोगरा यांनाही मागणी होती. सिझनमध्ये फुलांची आणि पानांची एकूण उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरांत होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.