Join us  

आमची युती होणारच, सत्ताही येणार; उद्धव ठाकरेंचे युतीवर शिक्कामोर्तब !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 1:42 AM

मोदींची मुक्तकंठाने केली प्रशंसा । करायचं ते दिलखुलास करायचं, असं आमचं आहे

मुंबई : शिवसेना-भाजपची युती नक्की होणार आणि राज्यात एक मजबूत सरकार येणार या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युतीवर शिक्कामोर्तब करीत सर्व शंकांना पूर्णविराम दिला. मेट्रो स्टेशन आणि मार्गाच्या भूमिपूजन समारंभात बोलताना उद्धव यांनी काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

पुन्हा युतीचेच सरकार येणार. करायचं ते दिलखुलास करायचं, असं आमचं आहे. आम्हाला सत्ता हवी आहे पण सत्तेची हाव नाही. जनतेसाठी सत्ता हवी आहे. राज्याच्या विकासासाठी आमचं मित्रपक्षांचं सरकार येणारच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.भाजप-शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा सुरू असताना उद्धव यांनी युतीवर शिक्कामोर्तब केल्याने दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल आणि ते एकत्रितपणेच निवडणुकीला सामोरे जातील, असे स्पष्ट संकेत मिळाले. युती होणारच या उद्धव यांच्या विधानास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलखुलास हसत दादही दिली.

देशाला दिशा देणारे नेतृत्व मोदींच्या रुपाने आम्हाला मिळाले आहे. काश्मीरनंतर आता मोदींच्या नेतृत्वात अयोध्येत राममंदिराची उभारणी आणि देशात समान नागरी कायदा आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘माझे लहान भाऊ’ असा केला. त्यावरून, युतीच्या जागा वाटपात शिवसेना लहान भाऊच राहणार, असे संकेत तर पंतप्रधांनी दिले नाहीत ना, अशी अटकळ सुरू झाली.

दोन-चार दिवसांत निर्णययुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या दोन-चार दिवसांत ठरेल, असे उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमानंतर मातोश्रीवर पत्रकारांना सांगितले. जागावाटपाचा फिप्टी-फिप्टी असा फॉर्म्युला ठरलेला नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की महाजन तो ठरवत नसून मी, अमित शहा आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेऊ.

टॅग्स :शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019