हृदयक्रिया बंद पडल्यावरही होणार अवयवदान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 03:01 IST2025-05-12T03:01:08+5:302025-05-12T03:01:49+5:30
आज देशात अवयवदान प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत.

हृदयक्रिया बंद पडल्यावरही होणार अवयवदान...
डॉ. सुरेंद्र माथुर, अध्यक्ष, मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती
आज देशात अवयवदान प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. त्यामुळे अनेक अवयव निकामी झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. भारतात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ संमत झाला. त्यानुसार अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. १९९४ मध्ये कायदा झाल्यानंतर १९९७-२००० मध्ये काही सार्वजनिक रुग्णालयांत मेंदूमृत अवयवदान सुरू करण्यात आले आणि त्यांच्याच रुग्णालयत प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांना ते अवयव शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपण करण्यात येऊ लागले. मात्र, ३१ मार्च २००० मध्ये कायद्याचा आधार घेऊन देशातील पहिली मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती सुरू करण्यात आली. ज्या रुग्णालयात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात, त्या सर्वांना या समितीशी संलग्न करण्यात आले. त्या समितीला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण देशाला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी नियमनाची दिशा दाखविण्याचे काम या समितीने केले आहे.
समितीचे काम अवयवांसाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची यादी बनविणे, तसेच एखाद्या मेंदूमृत अवयवदात्याकडून अवयव प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे ज्याला देणे गरजेचे आहे त्यांना देणे हे मुख्य काम आहे. तसेच अवयवदानाची जनजागृती करणे, रुग्णालयांना कायद्याद्वारे असलेल्या नियमांची माहिती करून देणे, अवयवनिहाय तज्ज्ञांची समिती स्थापन करणे, अशा पद्धतीने ही समिती काम करत असते. अवयवदान प्रक्रियेत नियमबाह्य कोणतेही काम केले जात नाही, अशी सुलभ पद्धत या ठिकाणी करून ठेवली आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यामध्ये वर्ष २०१७ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
देशात सध्या प्रमाणात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया वेगाने सुरू आहेत. त्यासोबत मेंदूमृत अवयवदानाचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये आजच्या घडीला महाराष्ट्र कधी क्रमांक एक वर असतो, तर कधी तीनवर असतो. ज्या दाक्षिणात्य राज्यात आज अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या राज्यांनी मुंबई समितीची रचना पाहूनच त्या ठिकाणी त्यांनी काम सुरू केले आहे. सध्याच्या घडीला मुंबईसोबत राज्यात नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांत समितीचे काम सुरू आहे.
२५ वर्षांनंतर नवीन काय?
सध्या अवयवदान आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आपल्याकडेसुद्धा या अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अवयवदान मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होईल. यापूर्वी केवळ मेंदूमृत व्यक्तीचे अवयव घेत होतो. मात्र, आता रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात हृदय बंद पडून रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे अवयवदानसुद्धा कशा प्रकारे करता येतील यावर काम सुरू आहे.
मुंबईत दोन रुग्णालयांत यावर वैद्यकीय परिषदासुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही तंत्रज्ञांचा वापर करावा लागणार आहे. या अशा पद्धतीने हृदय बंद पडल्यानंतर होणाऱ्या अवयवदानाला डोनर आफ्टर सर्क्युलेटरी डेथ ज्याला पूर्वी हृदयक्रिया शून्य मृत्यूनंतरचे अवयवदान किंवा नॉन-हार्टबीटिंग अवयवदान असेही म्हटले जात होते. सध्या हे अशा पद्धतीचे अवयवदान परदेशात होत आहे. यासाठी काही नियम बनविण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच नवीन ६० वर्षांच्या मेंदूमृत व्यक्तीकडून मिळालेली किडनी, रुग्णावर प्रत्यारोपण करण्यापूर्वी आता किडनी नॉर्मोथर्मिक मशीन परफ्यूजन या मशीनद्वारे नैसर्गिक स्थितीत या अवयवांचे जतन केले जाते. त्यामुळे किडनी व्यवस्थित आहे की नाही, हे प्रत्यारोपण करण्यापूर्वी कळते. त्यामुळे गुंतागुंत निर्माण होत नाही. परदेशी अशा पद्धतीच्या मशीन वापरल्या जातात. त्या आपल्याकडेही वापरणे शक्य होईल.
२५ वर्षे पूर्ण करण्याचा हा प्रवास खूप मोठा आहे. यामध्ये विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. केईएम रुग्णालयातील किडनीविकार तज्ज्ञ विभागाच्या डॉ. विद्या आचार्य यांनी वर्ष १९९२ मध्ये अवयवदानासंदर्भातील कायदा आणि विभागीय समिती व्हावी, याबाबत काम सुरू केले होते. त्यानंतर डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. गुस्ताद डावर, डॉ. भरत शाह आणि अन्य डॉक्टरांनीसुद्धा समितीसाठी मोठे काम केले आहे.