Join us

‘जेजे’तील अवयवदानातून 7 रुग्णांना जीवदान, मेंदूमृताच्या नातलगांचा सुज्ञ निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 07:35 IST

या अवयवदानातून दोन किडन्या, फुफ्फुस, हृदय, स्वादुपिंड, यकृत, लहान आतडे आणि डोळे दान करण्यात आले.

मुंबई : जेजे रुग्णालयात नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३६ वर्षांच्या मेंदूमृताच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे सात रुग्णांना जीवदान मिळाले. या अवयवदानातून दोन किडन्या, फुफ्फुस, हृदय, स्वादुपिंड, यकृत, लहान आतडे आणि डोळे दान करण्यात आले. मुंबईतील या वर्षातील हे दुसरे अवयवदान आहे.     

जळगाव येथील विलास पाटील यांना मंगळवारी गोरेगाव येथे अपघात झाला. जेजे रुग्णालयात  उपचारादरम्यान ते मेंदूमृत झाले. वैद्यकीय सामाजिक अधीक्षक सुनील पाटील, राजेंद्र पुजारी यांनी त्यांच्या नातेवाइकांना अवयदानाची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड, डॉ. दिलीप गवारी, डॉ. रेवत कनिंदे यांनी प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर नातलगांनी अवयदानाला संमती दिली. न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. गजानन चव्हाण रुग्णालयाच्या मेट्रन योजना बेलदार यांनी या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सरकारी रुग्णालये अवयवदानात मागेमेंदूमृत अवयवदान प्रामुख्याने खासगी रुग्णालयांत होते. सरकारी रुग्णालयांत त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सरकारी रुग्णालयांत मोठ्या संख्येने मेंदूमृत रुग्ण असतात. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे अवयवदान कमी होते.   

 अवयवदान प्रक्रियेत मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र माथूर म्हणाले, जेजे रुग्णलय प्रशासनाचे अभिनंदन केले पाहिजे, कारण सरकारी रुग्णालयांत फार कमी प्रमाणात अवयवदान होते. इतर सरकारी रुग्णालयांनी जेजेकडून बोध घेतला पाहिजे. 

अवयवदानातील सर्व बाबी कायदेशीर प्रक्रियेत पार पाडाव्या लागतात. जेजेच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. रुग्णालयातील सर्वांच्या मदतीने ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. आम्ही आता मेंदूमृतांच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.      - डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, सर जेजे रुग्णालय

टॅग्स :जे. जे. रुग्णालयमुंबई