मुंबई - राज्यातील गाढवांची संख्या घटत चालल्याने राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या अखत्यारित असलेल्या पशुसंवर्धन मंत्रालयाने याबाबत काळजी व्यक्त केली आहे. त्यामुळे, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या आहेत. गाढवांच्या संरक्षणासाठी तात्काळ पाऊलं उचलण्याचे आदेशही या नोटीशीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गाढवांचे अवयव आणि रक्ताचा वापर पशु खाद्यामध्ये अनेकदा केला जातो. तसेच आजारांवर उपचारासाठीही गाढवाच्या रक्ताचा उपयोग केला जातो. फायद्यासाठी गाढवांच्या कत्तली घटवून आणल्या जात आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास गाढवं नामशेष होतील, अशी भीती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. परकाळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाढव प्राणी टीकाव आणि त्यांचे अस्तित्व अबाधित राहावे यासाठी पुशसंवर्धन विभागाने गाढवांच्या संरक्षणाचे आदेश दिले आहेत.
लेखक लक्ष्मण माने यांनी उपरा या कादंबरीतून गाढव आणि खेचर यांच्या वापराचे वर्णन केले आहे. भटकंती करणारे किंवा दररोज आपले ठिकाण बदलणारे बिऱ्हाड आपल्या सामानाची ने-आण करण्यासाठी गाढवाचाच वापर करते. त्यामुळे मतदनीस प्राणी म्हणून गाढवाकडे नेहमीच पाहिले जाते. दरम्यान, गाढवांची घटती संख्या हा गंभीर विषय बनल्याचे दिसून येते.