विरोधी पक्षनेत्यांचा वॉर्ड रिपोर्ट : वॉर्ड तसा चांगला, पण आवाजाने दणाणलेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:30 IST2026-03-12T12:30:17+5:302026-03-12T12:30:41+5:30
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग १९९ हा म्हणायला चांगला पण, आवाजाने दणाणलेला आहे.

विरोधी पक्षनेत्यांचा वॉर्ड रिपोर्ट : वॉर्ड तसा चांगला, पण आवाजाने दणाणलेला
महेश पवार,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग १९९ हा म्हणायला चांगला पण, आवाजाने दणाणलेला आहे. मुंबईचा प्रसिद्ध धोबीघाट, ऑर्थर रोड जेल, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ मोनोरेल स्टेशन, करी रोड ते लोअर परळ स्टेशनचा काही भाग, असा हा प्रभाग विस्तारलेला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या व गजबजलेल्या या प्रभागात ध्वनिप्रदूषण व अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन व ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
प्रभागातील काही भागांत रस्त्यांवरील खड्डे, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्याच्या काही तक्रारी आहेत. महालक्ष्मी ते वडाळा मोनोरेलचा मोठा मार्ग या प्रभागातून जातो. मोनोरेलसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले. मात्र, ते पूर्ववत न केल्याने सातरस्ता ते करी रोडपर्यंतचा मार्ग ठिकठिकाणी खड्डेमय झाला आहे. त्यातच पार्किंगची कमतरता, अरुंद रस्ते आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्विकास प्रकल्पांमुळे काही ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने धुळीचा त्रास होऊन अनेकांना श्वसन विकाराचा त्रास होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
प्रभागाचा लेखाजोखा
७५% इमारती
२५% झोपडपट्टी
प्रभागात सध्या सुरू असलेला प्रकल्प: धोबीघाट येथे नवीन जलवाहिनी जोडणीचे काम सुरू.
प्रभाग क्र.: १९९ (करी रोड ते सातरस्ता)
भागाचे नाव: जी/दक्षिण वॉर्ड
विधानसभा मतदारसंघ: वरळी
लोकसभा मतदारसंघ: दक्षिण मुंबई
प्रभागाची लोकसंख्या: सुमारे ६० हजार
असे आहे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र
प्रमुख रस्ते: ना. म. जोशी मार्ग, साने गुरुजी मार्ग, सातरस्ता, डिलाईल रोड, जेकब सर्कल.
महत्त्वाची ठिकाणे: धोबी घाट, ऑर्थर रोड जेल, करी रोड.
शैक्षणिक संस्था: पीपल्स एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र स्कूल, ना. म. जोशी महापालिका शाळा, मुंबई पब्लिक स्कूल.
महत्त्वाची धार्मिक / सामाजिक स्थळे: श्री विजय दत्त स्वामी समर्थ मठ (ना. म. जोशी मार्ग).
रुग्णालये: महापालिका दवाखाना, करी रोड क्लिनिक, मेट्रोपोलिस हेल्थकेअर.
उद्याने: कै. लक्ष्मण (बापू) सँभू सरवणकर उद्यान, श्रमिक जिमखाना खेळाचे मैदान.
प्रभागातील प्रमुख समस्या (चिन्हांसहित माहिती)
वाहतूककोंडी: ऑर्थर रोड जेल, संत गाडगेबाबा महाराज चौक, करी रोड स्टेशन, डिलाईल रोड येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे.
पार्किंग: प्रभागात पार्किंग व्यवस्था नसल्याने पदपथावर ठिकठिकाणी अवैध पद्धतीने दुचाकींची पार्किंग केल्याचे आढळून आले.
रस्त्यांची अवस्था: काही ठिकाणी खासगी प्रकल्पांचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांमुळे तसेच मोनो रेल्वेसाठी उभारलेल्या खांबांमुळे रस्ते खोदले, पण ते योग्यरीतीने न भरल्याने खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे.
आरोग्य व्यवस्था: प्रभागात मोठे रुग्णालय नसले, तरी महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांवर वेळेत उपचार केले जातात. शिवाय कस्तुरबा, नायर, केईएम यांसारखी रुग्णालये जवळपास असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार करता येतात.
अतिक्रमणे: प्रभागात पदपथ मोठे असले तरी त्या खाद्यपदार्थांच्या विविध स्टॉलने व्यापले आहेत. अवैध बाईक पार्किंग व खाद्यपदार्थांचे स्टॉल, यामुळे पादचाऱ्यांना चालायला जागा नाही.
"प्रभागातील धोबीघाटमधील व्यावसायिकांची समस्या सोडविण्यास प्राधान्य असेल. काही जुन्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरांनी हाती घेतला आहे. मात्र, अनेक बिल्डरांनी १८ ते २० वर्षे रहिवाशांचे भाडे थकविले आहे. रहिवाशांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांना वेळेत व योग्य पाणीपुरवठा होण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे."
— किशोरी पेडणेकर, नगरसेविका व विरोधी पक्षनेत्या
"पदपथावरील बेकायदा बांधकामे हटविण्यासाठी वॉर्डातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील. प्रभागाचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला जाईल. वाहतूककोंडीवर ठोस मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू. आरोग्य सेवेच्या अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील."
— स्वप्नजा क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त, जी दक्षिण विभाग
स्थानिक काय म्हणतात?
"पदपथावरील अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांना वेळीच आवर घातला पाहिजे. त्यांच्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. धोबीघाटात पहाटे ४ वाजल्यापासून कपडे धुण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. सातरस्ता येथील मोठ्या रस्त्यावरही भाजीपाला, फळविक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहनांच्या रांगा लागून त्यात नागरिक अडकून पडतात."
- कुणाल सावंत, धोबीघाट परिसर
"प्रभागातील उद्याने सुस्थितीत आहेत. प्रभाग सुंदर दिसावा, यासाठी पदपथावरील झाडांच्या बाजूला सुशोभीकरण करून चौथरे बांधण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके, शेड उभारून विश्रांतीसाठी व्यवस्था केली आहे. मात्र, पदपथावरील वाहने हटविल्यास ज्येष्ठ नागरिक, मुले यांना चालण्यास अडचण होणार नाही."
-सुनील गमरे, डिलाईल रोड
सकाळ-सायंकाळ गजबजलेला परिसर
मुंबईचा धोबीघाट पाहण्यासाठी अनेक देश-विदेशातील नागरिक येत असतात. तर, ऑर्थर रोड जेलमधील कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाइकांची मोठी गर्दी वाढते. लोअर परळ, करी रोड परिसरातील व्यावसायिक संकुलात अनेक कंपन्यांची कार्यालये असल्याने सकाळ-सायंकाळ हजारो कर्मचाऱ्यांची ये-जा असते. परिणामी रस्त्यांवर मोठी वर्दळ होऊन वाहतुकीवर ताण पडतो.
रेटिंग
रस्ते : ★★☆☆☆
स्वच्छता : ★★★★☆
हवेचा दर्जा : ★★★☆☆
आरोग्य : ★★★★☆
पार्किंग : ★☆☆☆☆
(अतिशय चांगले - ५ स्टार, चांगले - ४, ठीकठाक - ३, वाईट - २, अत्यंत वाईट - १)