मुंबई : आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची विरोधी व सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार व माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी सरकारने आता ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे. कोर्टकचेरीच्या भानगडीत न अडकता डिसिझन लेने का तो अभी लेने का, अशी प्रतिक्रिया दिली. तर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सरकारचा दुवा म्हणून इथे आलो असून स्वतः सरकारशी बोलेन, असे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात उद्धवसेनेचे खा. संजय बंडू जाधत (परभणी), खा. ओमराजे निंबाळकर (धाराशिव), आ. कैलास पाटील (धाराशिव), राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खा. बजरंग सोनवणे (बीड), खा. भास्कर भगरे (दिंडोरी), खा. निलेश लंके (अहमदनगर), आ. संदीप क्षीरसागर (बीड), आ. अभिजित पाटील (माळा), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू नवघरे (वसमत) यांच्यासह शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे व करुणा मुंडे यांनी भेट घेत त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत बोलावून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन गुलाल उधळायला लावला होता. त्यावेळी जो शब्द दिला होता तो विचार करून दिला होता का, की अविचाराने दिला होता? वेळ मारून नेण्यासाठी दिला होता का? ज्यांनी शब्द दिला त्यांनी त्याची पूर्तता करायला हवी. ती फसवणूक आहे की नाही? त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता त्याचे पालन करायलाच हवे, अशी टीका उद्धवसेनेचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी केली.
समाजाचा विषय असल्याने मराठा म्हणून आंदोलनास आलो आहे. आता सुरवात झाली आहे. आगे, आगे देखो होता हैं क्या? लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून मागण्या मांडणे हा आमचा अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्यांनी विरोधकांकडे बोट दाखवू नये. आम्ही सत्तेत असतो तर आमची बांधिलकी असती.- खा. संजय बंडू जाधव
मुंबईत २ टक्केही लोक आली नाहीत. काही लोक अजूनही बाहेरच आहेत. सरकारची भूमिका सांगता येत नसली तरी त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. ओबीसीमधून आरक्षण मिळावे याला पाठिंबा आहे. आंदोलनाची पुढील जी दिशा असेल त्याप्रमाणे सहभागी होऊ.- खा. बजरंग सोनवणे
मुंबईने गर्दीचा विश्वविक्रम मोडला आहे. अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले पाहिजे. सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे. किती दिवस ताटकळत ठेवणार आहे. एक घाव दोन तुकडे केले पाहिजे. किती दिवस घोंगडे भिजत ठेवणार आहे? दुर्जनांना बुद्धी द्यावी आणि आंदोलनाला यश देवो, अशी गणरायाला प्रार्थना करतो.- खा. नीलेश लंके