पीकविमा योजनेवरून विधानसभेत विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 18:01 IST2017-07-31T18:01:21+5:302017-07-31T18:01:45+5:30
राज्य सरकारने तातडीने केंद्राशी बोलून या योजनेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावून धरली

पीकविमा योजनेवरून विधानसभेत विरोधक आक्रमक
मुंबई, दि. 31 - पीकविमा योजनेसाठी पैसे भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख असली तरी तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे अद्याप लाखो शेतकरी रांगेत उभे असून, राज्य सरकारने तातडीने केंद्राशी बोलून या योजनेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावून धरली. या मुद्द्यावर विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले होते.
विरोधी पक्षांनी याबाबत आज स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. यासंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की, पीकविमा योजनेकरिता ऑनलाइन अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. कधी सर्व्हर डाऊन तर कधी इंटरनेट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर दोन-दोन दिवस कामे सोडून रांगेत उभे राहण्याची वेळ ओढवली आहे. यातून निर्माण झालेल्या तणावामुळे राज्यात दोन शेतकऱ्यांचा रांगेत उभे असताना मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, राज्य सरकारने आजच्या आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्राकडे घेऊन जावे आणि केंद्र सरकारला राज्याची परिस्थिती विषद करून पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मिळवावी, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली.
सरसकट कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव द्या, या मागणीसाठी लासलगावमध्ये काल शेतक-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत जोरदार घोषणाबाजी केली. तर मीडियासाठी केली जाणारी ही स्टंटबाजी असल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यावर उतारा म्हणून उपस्थितांना टाळ्या वाजविण्यास सांगितले. त्यामुळे एकीकडे टाळ्या आणि दुसरीकडे पोटतिडकीने घोषणा देणारे शेतकरी, असे चित्र दिसले होते.
लासलगाव येथे 5 कोटी रुपये खर्चून देशातील पहिले अत्याधुनिक कांदा शीतगृह उभारण्यात आले असून, त्याचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. फडणवीस यांच्या भाषणाप्रसंगी येवला येथील संतू पाटील-झांबरे यांच्यासह चार-पाच शेतक-यांनी घोषणाबाजी केल्यामुळे सभेत पाच-दहा मिनिटे सभेत गोंधळ झाला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत मीडियाचे लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर झळकावी, यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे सांगितले. ही स्टंटबाजी आहे. जनतेने अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे. टाळ्या वाजवून अशा अपप्रवृत्तीला विरोध करा, असे फडणवीस यांनी म्हणताच सभेत टाळ्यांचा एकच गजर झाला होता. दुसरीकडे एका कोप-यात शेतक-यांची घोषणाबाजी सुरूच होती.