Join us  

वृक्षतोडीविरोधात ‘लोक’मत ऐकाच; पर्यावरणवाद्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 6:36 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी आरेमधील कारशेडकरिता तोडल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम असून, आता या प्रकरणी वृक्ष प्राधिकरणाने पुन्हा एकदा सुनावणी घ्यावी, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी आरेमधील कारशेडकरिता तोडल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम असून, आता या प्रकरणी वृक्ष प्राधिकरणाने पुन्हा एकदा सुनावणी घ्यावी, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिकेने आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतलेले नाही, अशी खंत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली असून, वृक्षतोडीला कायमच विरोध दर्शविला आहे.

जनसुनावणीबाबत ‘लोकमत’शी बोलताना पर्यावरणवाद्यांनी सांगितले की, मेट्रो-३ साठी आरेमध्ये कारशेड उभारण्यात येणार आहे. वनशक्तीने या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर हरित लवादाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बाजूने कौल दिला. परिणामी, आरे कारशेडसाठीचा मार्ग मोकळा झाला. मात्र, असे असले, तरी येथील झाडे तोडण्याबाबत मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. वृक्ष प्राधिकरणाकडे आॅनलाइन तब्बल पंधरा हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सूचना आणि हरकतींबाबत भायखळा येथील राणीच्या बागेत नुकतीच जनसुनावणी ठेवण्यात आली होती.

या जनसुनावणीला हजारांहून अधिक नागरिक हजर होते. मात्र, पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार, वृक्ष प्राधिकरणाने केवळ दोन तासांतच जनसुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे सविस्तर भूमिका मांडताच आली नाही, अशी खंत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुन्ह सुनावणी घेऊन वृक्षतोडीविरोधात ‘लोक’मत ऐकाच असे आवाहनही पर्यावरणवाद्यांनी केले आहे.‘पुरेसा वेळ मिळालाच नाही’जनसुनावणीला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह आदिवासी समाजाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. मात्र, जनसुनावणीला मुद्दे मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. जनसुनावणीसाठीचा वेळ कमी होता. महत्त्वाचे म्हणजे, जनसुनावणीदरम्यान अर्धेअधिक लोक बाहेरच होते. परिणामी, सर्व पर्यावरणवाद्यांना सविस्तर म्हणणे मांडता यावे, याकरिता पुन्हा जनसुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. दरम्यान, दोन हजारांहून अधिक झाडे तोडली, तर मोठा हरितपट्टा मुंबई गमावून बसेल, अशी भीतीही पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :मेट्रोवातावरण