Join us  

...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 1:46 PM

Nanar Refinery Project: नाणार प्रकल्प समर्थकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई: स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प  (Nanar Refinery Project) रद्द करण्यात आला आहे.  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पाबाबत भूमिका मांडल्यानंतर तेथील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले. त्यानूसार नाणारवासीयांनी कृष्णकुंजावर राज ठाकरेंची भेट घेतली. आपल्या राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाता कामा नये. तेथीर नागरिकांच्या काही समस्या नक्कीच असतील. मात्र यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल, असं राज ठाकरेंनी यावेळी त्यांना सांगितलं. तसेच आमचं ऐवढं काम मार्गी लावा, असं साकडं देखील नाणारवासीयांनी केलं राज ठाकरेंकडे केलं आहे. 

नाणार प्रकल्प समर्थकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. नाणार प्रकल्पाचे समर्थक आणि RRPCL कंपनीचे अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला मनसेचे नेते अनिल शिदोरे हे RRPCL कंपनीचे सीईओ बालासुब्रमण्यम अशोक व अनिल नागवेकर यांनी भेटले होते, असा दावा रामचंद्र भडेकर यांनी केला आहे. यानंतर नाणार प्रकल्पाचे समर्थक राज ठाकरे यांना 28 फेब्रुवारीलाच भेटणार होते. पण मुख्यमंत्र्यांना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला व ही भेट एक आठवडा लांबणीवर पडली, असा आरोप रामचंद्र भडेकर यांनी केला आहे. 

स्थानिकांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता केवळ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नादाला लागूनच अचानक दोन वर्षानंतर समर्थनाची डायरेक्ट भूमिका मांडणे हे सरळ सरळ विश्वासघातकी कृत्य आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच दुःखावलो गेलो आहोत. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून कुणी कितीही प्रयत्न केला तरी रिफायनरी नाणार परिसरात येऊ देणार नाही, असं रामचंद्र भडेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. 

राज ठाकरेंची नाणार प्रकल्पाबाबतची भूमिका अगदी योग्य- देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंनी नाणारबाबात घेतलेल्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. तसेच राज ठाकरे या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असं विधानही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

 शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन-

राज ठाकरेंचं पत्र वाचल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली. तसेच मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासाही राज ठाकरे यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील- उदय सामंत

राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्या भूमिकेतून राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नाणार प्रकल्प नको, अशीच स्थानिकांची भूमिका आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, असे मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. नाणार प्रकल्पाची गोष्ट शिवसेनेसाठी संपली आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

पत्राद्वारे नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी' म्हणजेच नाणार सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. तसेच, कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटन स्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :राज ठाकरेनाणार प्रकल्पनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पउद्धव ठाकरेमनसे