भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 19:59 IST2025-05-09T19:58:02+5:302025-05-09T19:59:55+5:30
Mumbai Police On Dadar Chowpatty Rumours: भारत आणि पाकिस्तान याच्यातील तणावामुळे मुंबईतील दादर चौपाटी नागरिकांसाठी बंद करण्यात आली, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या पसवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक असलेले दादर चौपाटी नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचा मेसेज फेसबूक, एक्स आणि व्हॉट्सअपसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडून महत्त्वाची माहिती शेअर करण्यात आली. दादर चौपाटीबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज बनावट असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
मुंबई पोलिसांनी एक्स अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे. नागरिकांना नम्र विनंती आहे की, केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्यापित बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका. तुमचे सहकार्य चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत करेल.'
#FakeNewsAlert
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) May 9, 2025
सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे.
आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज…
दरम्यान, आज सकाळी मुंबईतील साकीनाका परिसरात हजरत जय्यब जलाल मशिदीजवळ अज्ञात ड्रोन दिसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. सहार विमानतळ प्रशासनाने शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली आणि नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.