‘खुल जा सिम सिम’, उद्या खुलणार ‘म्हाडा’ची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:58 IST2025-10-10T06:58:00+5:302025-10-10T06:58:00+5:30
कोकण मंडळातर्फे लॉटरी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.

‘खुल जा सिम सिम’, उद्या खुलणार ‘म्हाडा’ची लॉटरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व वसई (पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार ३५४ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात येईल. यासाठी १ लाख ८४ हजार ९९४ अर्ज आले असून अनामत रकमेसह १ लाख ५८ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
कोकण मंडळातर्फे लॉटरी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिंकवर व म्हाडाच्या फेसबुक व यू-ट्यूब पेजवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा आहे. थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना तत्काळ निकाल जाणून घेता येणार आहे.
विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाइटवर सायंकाळी ६ नंतर प्रसिद्ध होईल. विजेत्या अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त होईल.
- रेवती गायकर,
मुख्य अधिकारी, कोकण मंडळ