Join us

नारी शक्तीच्या मदतीनेच विकासाची उंची गाठता येईल; राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 07:52 IST

‘लोकमत वुमन्स अचिव्हर्स अवॉर्ड्स’ सोहळा दिमाखात संपन्न

मुंबई : जगाला आणि देशाला विकासाची उंची गाठायची असेल तर महिला शक्तीचा गौरव करायला हवा. महिला शक्तीशिवाय भारत विकासाची उंची गाठू शकत नाही. नारी शक्तीच्या मदतीने देशाला विकासाची उंची गाठता येईल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

कफ परेड येथे बुधवारी रंगलेल्या ‘लोकमत’ आयोजित ‘वुमन्स अचिव्हर्स अवॉर्डस’ सोहळ्यात राहुल नार्वेकर बोलत होते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती, तर लोढा फाउंडेशनच्या चेअरपर्सन आणि महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा, स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापक सिद्धी जयस्वाल, आयएसएआरच्या अध्यक्षा आणि बल्मू आयव्हीएफ समूहाच्या वैद्यकीय संचालिका प्रा. नंदिता पालशेतकर, विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषा सरनाईक, आस्क फाउंडेशन २४च्या फाउंडर अवनी अगस्थी, बाकलीवाल फाउंडेशन कॉलेजच्या विश्वस्त व कार्याध्यक्ष सीमा बाकलीवाल, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट व आहार तज्ज्ञ ख्याती रुपानी, पद्मावती पल्प अँड पेपर मिल्स व निक्को वेलनेस डॉ. फोरम धेडिया, जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता आणि मिराकेम इंडस्ट्रीजचे (ॲम्पल मिशन, ब्रेथिंग लाइफ इन टू फॅब्रिक) व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल काशी मुरारका उपस्थित होते.

‘लोकमत वुमन अचिव्हर्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुरू नीलेश सिंग यांनी कार्यक्रमाची सुरुवात गणेश नृत्याने केली. सोहळ्याचे पार्टनर आस्क फाउंडेशन २४ आणि मिराकेम इंडस्ट्रीज (ॲम्पल मिशन, ब्रेथिंग लाइफ इन टू फॅब्रिक) होते.

राहुल नार्वेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आला असून, २०२७ साली जगातील तिसरी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उल्लेख केला जाईल, तर २०४७ साली भारत संपूर्णरीत्या विकसित देश म्हणून नावारूपाला आलेला असेल.आदिती तटकरे म्हणाल्या, नवरात्रीत साडीच्या रंगाची सर्वत्र चर्चा होत असताना ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपण महिलांच्या कार्याची दखल घेत आहात ही अभिमानाची गोष्ट आहे. लोकमत सखी मंचच्यावतीने महिलांच्या कार्याची घेण्यात येणारी दखल वाखाणण्याजोगी आहे.

विजय दर्डा म्हणाले, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा म्हणायचे, स्त्री शक्तीचा कायम सन्मान केला पाहिजे. कारण आपण जे स्वातंत्र्य मिळवले ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर स्त्री शक्तीचा सन्मान होणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलेला सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका ‘लोकमत’ने कायम ठेवली. ‘लोकमत’चे काम केवळ बातमी देणे हे नाही, तर जागरूक समाज निर्माण करणे आहे. ज्योत्स्ना दर्डा यांनी ‘लोकमत’ सखी मंच स्थापन केला. आज राष्ट्रीय स्तरावरील हे सर्वांत मोठे व्यासपीठ असून, पाच लाख महिला यासोबत जोडल्या गेल्या आहेत. तर बारा वर्षांपूर्वी आम्ही पुण्यात ‘ती’चा गणपतीची प्रतिष्ठापना केली. आम्हास यास विरोध होऊनही आम्ही आमची भूमिका कायम ठेवली. आम्ही कुणाला जुमानले नाही. आता प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ‘ती’चा गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहोत.

English
हिंदी सारांश
Web Title : Development's Height Achievable Only With Women Power: Rahul Narvekar

Web Summary : Rahul Narvekar emphasized women's vital role in India's development at Lokmat's 'Women Achievers Awards.' He highlighted India's economic progress under Modi, with Aditi Tatkare praising Lokmat's recognition of women's achievements. Vijay Darda underscored Lokmat's commitment to women's empowerment, continuing his father's vision.
टॅग्स :राहुल नार्वेकरलोकमत