मुंबई : मुंबईत तळागाळात खरी ताकद केवळ मनसे व उद्धवसेना या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांची एवढी ताकद नाही. सभांना गर्दी जमवून निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी तळागाळात यंत्रणा उभारणे आवश्यक असून पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना दिले.
वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये राज यांच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राज यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती, मतदार याद्यांची तपासणी, स्थानिक पातळीवरील संघटन बळकटीकरण, मोर्चेबांधणीवर भाष्य केले.
२०१७ पासून मतदार यादीतील घोळाबाबत आपण बोलत आहोत आता इतर पक्ष हा मुद्दा घेत आहेत, असे सांगून ते म्हणाले, निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारीने काम करावे. वॉर्डमधील मतदार याद्या तपासण्यासाठी प्रत्येक शाखाध्यक्षाने दोन कार्यकर्त्यांची नेमणूक करावी. प्रत्येक वॉर्डात ११० सदस्यांची टीम तयार करून त्यांना विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित कराव्या. खालच्या पातळीपर्यंत संघटनात्मक बळकटीकरणावर भर द्यावा. अनंत चतुर्दशीनंतर याचा आढावा घेतला जाईल, असे राज यांनी स्पष्ट केले.