Join us  

लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 4:42 AM

संविधान आणि लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधान आणि लोकशाही रक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज राहावे

मुंबई : संविधान आणि लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधान आणि लोकशाही रक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.दादर येथील प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात थोरात म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी मोठा संघर्ष करून, बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. त्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले, देशाची प्रगती झाली. पण दुर्दैवाने आज सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढा देण्याची गरज आहे.या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, आशिष दुआ, चेल्ला वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, भालचंद्र मुणगेकर, चारुलता टोकस, विलास औताडे, गणेश पाटील, राजन भोसले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वर्षा निवासस्थानी ध्वजवंदनदेशाच्या स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. या वेळी त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. या वेळी निवासस्थानातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनी राज्यपालांकडून वृक्षारोपणभारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुणे विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. मुख्य ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यपालांनी सकाळी राजभवनात वृक्षारोपणही केले. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीतकुमार, खासदार संजय काकडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.गुणवंतांचा सन्मानस्वातंत्र्य दिनानिमित्त वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शेलार आणि स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांच्या हस्ते जितेंद्र शर्मा, पूजा पांडे व डॉ. योगेश दुबे यांना २०१६-१७ सालचा जिल्हा युवा पुरस्कार तर आशुतोष पांडे, अपूर्वा वेल्हाळकर व राधा दळवी यांना २०१७-१८ चे जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. लघुउद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबाबत नील बिव्हरेजेस प्रा.लि. अंधेरी आणि हर्ष प्रेसिअस मेटलन्स प्रा.लि. गोरेगाव या कंपनीच्या उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर शेलार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते.मुख्य न्यायमूर्तींनीही केले ध्वजवंदनमुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली. या वेळी न्यायमूर्ती कुरेशी, बी.पी. धर्माधिकारी, एस. सी. धर्माधिकारी यांच्यासह वरिष्ठ न्यायाधीश, मुख्य सचिव अजय मेहता, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय बर्वे, अमृता फडणवीस यांच्या समवेत निवृत्त न्यायाधीश, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.विधान भवनात स्वातंत्र्य सोहळाविधान भवनात स्वातंत्र्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विधान भवनाच्या प्रांगणात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्यासह विधानमंडळ सचिवालयाचे सचिव यू.के. चव्हाण, उपसचिव विलास आठवले, जितेंद्र भोळे, मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, नागनाथ थिटे, अवर सचिव सायली कांबळे, सोमनाथ सानप, रवींद्र जगदाळे, रंगनाथ खैरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या वेळी मानवंदना दिली.भाजप प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजराभाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात गुरुवारी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे ज्येष्ठ अभ्यासक रवींद्र भट यांचे भाषण झाले. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० व ३५ अ हटविल्यामुळे आता काश्मीर भारताशी जोडला गेला आहे.देशाच्या सर्व प्रांतांतील लोक मुक्तपणे जम्मू-काश्मीरमध्ये येऊ शकतात, असे ते म्हणाले. या वेळी भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश कार्यालय प्रभारी प्रताप आशर, मुंबई संघटनमंत्री सुनील कर्जतकरआणि प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

टॅग्स :आ. बाळासाहेब थोरातकाँग्रेसलोकशाहीस्वातंत्र्य दिन