गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:53 IST2025-09-21T06:43:12+5:302025-09-21T06:53:19+5:30
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गरबा उत्सवांच्या ठिकाणी नजर असेल. ज्यांची देवीवर श्रद्धा-भक्ती नाही, त्यांना आत येऊ दिले जाणार नाही.

गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
मुंबई : नवरात्र उत्सवादरम्यान होत असलेल्या गरब्यांमध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा. गरबा आयोजकांनी प्रत्येकाला आधार कार्ड पाहूनच प्रवेश द्यावा, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भूमिकेचे समर्थन केले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या भूमिकेला तीव्र विरोध दर्शविला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, गरबा हा केवळ एक नृत्य प्रकार नाही तर ती दुर्गेची केलेली पूजा आहे आणि मूर्तिपूजेवर विश्वास नाही अशा लोकांना गरबा सुरू असताना प्रवेश दिला जाऊ नये. विविध मंडळांना आम्ही तशी सूचना केलेली आहे. प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येकाचे आधार कार्ड तपासून मगच प्रवेश द्या.
गरबा खेळायला वा बघायला जे येतील त्यांचे स्वागत प्रवेशद्वारावरच टिळा लावून करा म्हणजे ते हिंदूच असल्याचे स्पष्ट होईल. नायर यांनी असेही स्पष्ट केले की, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गरबा उत्सवांच्या ठिकाणी नजर असेल. ज्यांची देवीवर श्रद्धा-भक्ती नाही, त्यांना आत येऊ दिले जाणार नाही.
सर्वस्वी अधिकार संयोजकांचा : बावनकुळे
बावनकुळे म्हणाले, की पोलिसांच्या परवानगीने गरब्याचे आयोजन करण्यात आले असेल तर तेथे कोणाला प्रवेश द्यावा आणि कोणाला देऊ नये याचा अधिकार गरबा आयोजकांना आहे. वडेट्टीवार यांनी मात्र विश्व हिंदू परिषदेची ही भूमिका उगाच समाजात तेढ निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी समाजा-समाजात आग लावण्याचे काम विश्व हिंदू परिषद करत आहे. समाजात या निमित्ताने अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे.
‘हा उत्सव हिंदूंचाच; इतर धर्मीयांनी त्यात दखल देऊ नये’
प्रदेश भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन हे विहिंपच्या भूमिकेचे समर्थन करताना म्हणाले, की गरबा हा हिंदूंचा उत्सव आहे आणि इतर धर्मीयांनी त्यात दखल देण्याचे काहीही कारण नाही. मंत्री नितेश राणे म्हणाले, की गरब्यासाठी येणारे केवळ हिंदूच असले पाहिजेत. कारण, या उत्सव काळात फसवून लव्ह जिहादचे प्रकार घडतात. त्यामुळेच दांडियाच्या ठिकाणी केवळ हिंदूच गेले पाहिजेत ही सकल हिंदू समाजाची भावना आहे. उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी विहिंपच्या भूमिकेला विरोध दर्शविला. ते म्हणाले की, अशी भूमिका घेणाऱ्यांचा देश वेगळा असेल. त्यांना वेड लागले आहे. मग मुस्लीम देशांना नरेंद्र मोदी भेट देणार नाहीत का? आपल्या देशात मुस्लीम राष्ट्रप्रमुख येणार नाहीत असे घडणार आहे का? असा सवाल राऊतांनी केला.