दहा हजार सोसायट्यांना नोटीस; पालिकेकडे अवघ्या ६१ सोसायट्यांनी मागितली फांद्या छाटण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:52 IST2025-05-27T12:52:42+5:302025-05-27T12:52:51+5:30
केवळ ४२ अर्ज दाखल

दहा हजार सोसायट्यांना नोटीस; पालिकेकडे अवघ्या ६१ सोसायट्यांनी मागितली फांद्या छाटण्याची परवानगी
मुंबई :मुंबईतील १०,६१५ सोसायट्या, खासगी व सरकारी आस्थापनांना महापालिका उद्यान विभागाकडून वृक्ष छाटणीसाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. यापैकी अवघ्या ६१ सोसायट्या व आस्थापनांनी झाडांच्या फांद्यांच्या छाटणीसाठी परवानगी मागितली आहे. उर्वरित सोसायटी, आस्थापनांनी दुर्लक्ष केल्यास महापालिकेला त्याची छाटणी करावी लागणार आहे. तसेच रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठीही मध्य व पश्चिम रेल्वेनेही महापालिकेकडे अर्ज केले आहेत. आतापर्यंत ४२ अर्ज दाखल झाले आहेत.
पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून मोठ्या झाडांच्या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्याच्या छाटणीची कामे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जातात. मुंबईत एकूण साधारण २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. त्यापैकी साडे पंधरा लाखांहून अधिक झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आणि उर्वरित झाडे शासकीय इमारती, महापालिकेच्या अखत्यारीत तसेच विविध आस्थापनांच्या परिसरात आहेत.
४०,००० झाडांच्या फांद्यांची छाटणी अद्याप बाकी
सध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एक लाख सहा हजार झाडांच्या फांद्या छाटणीचे उद्दिष्ट आहे. मात्र, मुंबईतही पावसाळा नियोजित वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता असल्याने फांद्यांच्या छाटणीसाठी पालिकेच्या उद्यान विभागाला कसरत करावी लागणार आहे. अद्यापही ४० हजार झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम अपूर्णच आहे.
३९ हजार ९६ झाडांच्या छाटणीचे आव्हान
शहरात रस्त्याच्या कडेला एक लाख ८६ हजार २४६ झाडे आहेत. यामध्ये एक लाख ४५ हजार ३५६ झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे सर्वेक्षणातून समोर आले.
त्यापैकीही पावसाळ्यात पडण्याचा धोका असलेल्या एक लाख सहा हजार ४७२ झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे उद्दिष्ट ७ जूनपर्यंत निश्चित केले आहे.
मुंबईत आतापर्यंत ६७ हजार ३७६ झाडांची छाटणीचे काम पूर्ण झाले आहे. तर अजूनही ३९ हजार ९६ झाडांच्या छाटणीचे आव्हान पालिकेसमोर आहे.
कोणत्या कामांचा समावेश?
पालिकेकडून पावसाळापूर्व करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मृत तसेच धोकादायक असलेल्या झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांची छाटणी, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण, झाडांच्या पोकळ्या भरण, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे, झाडांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ नुसार झाडांची छाटणी केली जाते, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.