Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लवकरच राबविणार ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 06:33 IST

ऑनलाइन शिक्षणाची गरज आणखी काही महिने राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीनेही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करायचे? शिक्षण कसे द्यायचे?

सीमा महांगडेमुंबई : कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यावर बंधने आल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या साथरोगाच्या काळात मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक भवितव्याबाबतचा निर्णय घेणे आव्हानात्मक राहिले. या पार्श्वभूमीवर प्राध्यापिका असलेल्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी शिक्षक दिनानिमित्त केलेली बातचीत...मूळ पेशा शिक्षकी असल्याने राजकीय भूमिकेतून शिक्षकी कार्याकडे पाहताना काय वाटते?शिकविणे म्हणजे उद्याचे भविष्य घडविणे यासारखे दुसरे समाधान नसते. याउलट शिक्षणमंत्री म्हणून धोरणात्मक जबाबदारी पार पाडायची आहे. पण दोन्ही कामांचे अंतिम आउटपूट हे सारखे आहे. एक प्राध्यापिका म्हणून अनुभव असल्यानेच त्या गटाच्या समस्या, अडचणी जाणून, विद्यार्थ्यांचा, इतर घटकांचा दृष्टिकोन समजून घेऊन प्रशासकीय प्रणाली म्हणून निर्णय घेणे जास्त सुलभ होते.शालेय शिक्षणमंत्री की प्राध्यापिका कोणती भूमिका जास्त जवळची वाटते ?शिक्षणमंत्री म्हणून काम करताना मोठ्या प्रमाणावरील गटाचा विचार करून विविध समूहांसाठी योग्य धोरण ठरवावे लागते. समाजकारणात बरीच वर्षे काम केल्यानंतर शिक्षणमंत्री ही भूमिका जवळची आहे. मात्र प्राध्यापिका होणे ही माझी वैयक्तिक करिअर निवड असल्याने तीसुद्धा जास्त जवळ आहे.कोरोना काळानंतरची आव्हाने पेलण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत?

ऑनलाइन शिक्षणाची गरज आणखी काही महिने राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीनेही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करायचे? शिक्षण कसे द्यायचे? अध्यापनात कोणत्या गोष्टींवर भर द्यावा यासाठी ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंग या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांना अधिक सक्षम बनवण्याचा मानस आहे. कोविड काळात बरेचसे शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. मात्र ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण आणखी दर्जेदार कसे होईल याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार असून शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा टप्पा आहे.

राज्यातील शिक्षकांसाठी काय संदेश द्याल?कोविड काळात ऑनलाइन शिक्षणात शिक्षकांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे. शिक्षक कोरोना काळात समाजाला दिशा देत असून त्यांनी पुढील काळातही सातत्य टिकवण्यात शिक्षण विभागाला मदत करावी असे आवाहन मी करेन.

तरुणांचा शिक्षकी पेशाकडे कल कमी होतोय का?आज राज्यात शिक्षकांची संख्या कमी नाही. मध्यंतरी डीएड, बीएड महाविद्यालयांची संख्या वाढली. आजही नामांकित शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. व्यवसाय व करिअरच्या वाटा जसजशा विस्तारत आहेत तसा मुलांचा कल विभाजित होत आहे, त्यामुळेही अनेक छोट्या महाविद्यालयांत जागा रिक्त आहेत. पण याच महिन्यात होणाऱ्या टीईटीसाठी लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे तरुणाईचा कल शिक्षकी पेशाकडे कमी होत आहे, असे अजिबात नाही.

टॅग्स :मुंबईवर्षा गायकवाड