Mumbai Crime: मुंबईत एका ६५ वर्षीय पित्याने आपल्या हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी सलग सहा महिने दिलेला लढा अखेर थांबला. पोलिसांपासून ते मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यापर्यंत पित्याने सर्व प्रयत्न केले पण मुलाचा शोध लागू शकला नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर एका धक्कादायक हत्येचा उलगडा झाला आहे. कुर्ल्यातील राहुल खरवार (२५) या तरुणाची त्याच्याच मित्राने पैशांच्या वादातून मिठी नदीत ढकलून हत्या केल्याचे समोर आले असून, आरोपी अंकित साहू (२०) याला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
२४ जुलै २०२५ रोजी राहुल खरवारला त्याचा मित्र अंकित साहू याने फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर राहुल घरी परतलाच नाही. राहुलचे वडील योगेंद्र प्रसाद यांनी रात्रभर मुलाचा शोध घेतला. त्यांनी पोलीस ठाणे गाठले, पण पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर केवळ बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. राहुलचा शोध घेण्यासाठी वडिलांनी पोलीस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला, पण ठोस कारवाई झाली नाही.
उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप अन् पोलिसी तपासाला वेग
जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा योगेंद्र प्रसाद यांनी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. कोर्टाने झापल्यानंतर पोलिसांनी जानेवारी २०२६ मध्ये नव्याने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण केले असता, राहुल आणि आरोपी अंकितचे लोकेशन २४ जुलै रोजी संध्याकाळी ७:३० च्या सुमारास मिठी नदीच्या पुलावर एकाच ठिकाणी मिळून आले.
हत्येचा डिजीटल पुरावा अन् मृत्यूनंतरही UPI व्यवहार!
तपासात सर्वात धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, राहुलची हत्या झाल्यानंतरही त्याच्या मोबाईलवरून १०,५५६ रुपये यूपीआयद्वारे ट्रान्सफर करण्यात आले होते. आरोपी अंकितला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन होते आणि त्याच्यावर ४ ते ५ लाखांचे कर्ज होते. त्याने यापूर्वीच राहुलच्या पीएफचे २९,५०० रुपये फसवणुकीने लांबवले होते. जेव्हा राहुलने पैशांचा तगादा लावला, तेव्हा अंकितने त्याला मिठी नदीच्या पुलावर बोलावले आणि तिथून ढकलून दिले. राहुलचा खून केल्यानंतर अंकितने त्याचा फोन चोरला आणि त्यातील उरलेले पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले.
१०० कॉल्स करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही
"मी रात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसून होतो, मी मुलाला १०० फोन केले, रिंग वाजत होती, पण पोलिसांनी एकदाही त्या नंबरवर फोन करून लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला नाही. जर त्याच वेळी शोध घेतला असता, तर माझा मुलगा वाचला असता किंवा त्याचा मृतदेह तरी सापडला असता," असे राहुलच्या वडिलांनी सांगितले.
मृतदेह अद्याप सापडला नाही
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी राहुलचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सहा महिने उलटल्यामुळे मिठी नदीच्या पात्रात किंवा समुद्रात मृतदेह वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता एनडीआरएफ आणि बीएमसीच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेत आहेत.