मुंबईमध्ये कांद्याचे दर घसरले; रोज होतेय ११०० टन आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:54 IST2018-12-04T11:52:57+5:302018-12-04T11:54:24+5:30
भाजीपाला : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत.

मुंबईमध्ये कांद्याचे दर घसरले; रोज होतेय ११०० टन आवक
हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. कोबी, वांगी, फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामध्ये आता कांदा उत्पादकांचीही भर पडली आहे. सद्य:स्थितीमध्ये मुंबई बाजार समितीमध्ये रोज १००० ते ११०० टन कांदा आवक होत आहे.
उन्हाळी कांदा २ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. चांगला बाजारभाव मिळेल या आशेने चाळींमध्ये ठेवलेल्या मालाचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नवीन मालाला १३ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बटाट्याचे दरही होलसेल मार्केटमध्ये ७ ते १८ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
सद्य:स्थितीमध्ये साडेसात लाख जुडी पालेभाज्या व २३०० टन भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये होत आहे. फळ मार्केटमध्ये सरासरी १३०० टन कृषी मालाची आवक होत असून, कलिंगड व मोसंबीची सरासरी २५० टन आवक होत आहे. कलिंगड ७ ते ११ रुपये किलो विक्री होत आहे.