- याेगेश बिडवईमुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याचे दर घसरत असताना मुंबईत मात्र कांदा अजूनही ५० रुपये किलो दराने मिळत आहे. मध्यस्थांची साखळी आणि नफेखोरीमुळे मुंबईत कांदा महाग मिळत आहे. मुंबईपासून ३०० किलोमीटरवरील लासलगाव बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांना कांद्याला सर्वसाधारण २० रुपये किलो दर मिळाला. मुंबईत मात्र कांदा ५० रुपये किलोने मिळत आहे.
कांदा खरेदी केल्यानंतर...लासलगावला साधारण २० रुपये किलोने व्यापाऱ्याने कांदा खरेदी केल्यानंतर मार्केट फी (एक टक्का) हमाली, मालाची प्रतवारी करणे, गोणीत भरण्याची मजुरी, मुंबईत ट्रकने माल पाठविणे या सर्वांसाठी किलोमागे जास्तीत- जास्त अडीच रुपये खर्च येतो. त्यामुळे लासलगावचा २० रुपये किलोचा कांदा मुंबईत साधारण २२.५० रुपयांत पोहोचतो. मात्र नफेखोरीमुळे ताे ग्राहकाला महागात पडताे.
५० किलो एवढ्या वजनाच्या गोणीत कमीत- कमी ३ ते ४ किलो कांदे ओले निघतात. त्यानंतर किरकोळ कांदा विकताना वजन घट होते. नवी मुंबईत ३८ ते ४२ रुपये किलो दर सुरू आहे. गाडीभाडे, हमाली जाऊन फार पैसे सुटत नाहीत, असा किरकोळ विक्रेत्यांचा दावा आहे.
असा होतो कांद्याचा प्रवास १. शेतकरी, २. खरेदीदार (बाजार समिती), ३. घाऊक व्यापारी (मुंबई), ४. छोटे व्यापारी (मुंबई), ५. किरकोळ विक्रेते, ६. ग्राहक.