साथीच्या आजाराचा दररोज एक बळी

By Admin | Updated: August 22, 2015 01:41 IST2015-08-22T01:41:33+5:302015-08-22T01:41:33+5:30

पावसाने ओढ दिली असली तरी अधूनमधून बरसणाऱ्या सरींमुळे साथीचे आजार मुंबईकरांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. स्वाइन फ्लू, ताप, डेंग्यू, लेप्टो यांसारख्या साथीच्या

One victim of perilous disease every day | साथीच्या आजाराचा दररोज एक बळी

साथीच्या आजाराचा दररोज एक बळी

मुंबई : पावसाने ओढ दिली असली तरी अधूनमधून बरसणाऱ्या सरींमुळे साथीचे आजार मुंबईकरांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. स्वाइन फ्लू, ताप, डेंग्यू, लेप्टो यांसारख्या साथीच्या आजारांनी शहर आणि उपनगरात थैमान घातले आहे. साथीच्या आजाराने दररोज एकाचा मृत्यू झाला असून २१ आॅगस्टपर्यंत बळींचा आकडा २२पर्यंत वाढला आहे.
जून, जुलै महिन्यात दमदार बरसलेला पाऊस दोन आठवड्यांपासून गायब झाला असून दिवसागणिक उकाडा वाढत आहे. मात्र तरीही साथीच्या रोगांचा प्रभाव कमी झालेला नाही. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने साथ बळावत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत तापाचे तब्बल ४ हजार ४०५ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर स्वाइन फ्लू, लेप्टोसदृश रुग्णांची संख्याही वाढत आहे.
स्वाइन फ्लूचा कहर कायम असून आॅगस्टमध्ये आतापर्यंत स्वाइन फ्लूने १२ जणांचा बळी गेला आहे. गेल्या तीन दिवसांत पाच जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. मालाड येथे राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धेला १९ आॅगस्टला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी या महिलेचा
मृत्यू झाला. घाटकोपर येथील ७६ वर्षीय रुग्णाचा फोर्टिस रुग्णालयात याच दिवशी मृत्यू झाला. तसेच गोरेगाव येथील ६४ वर्षीय पुरुषाचा १८ आॅगस्ट रोजी, ठाण्याच्या एका ५८ वर्षीय पुरुषाचा १९ आॅगस्ट रोजी आणि भार्इंदर येथील ११ वर्षीय मुलाचा स्वाइनमुळे गुरुवारी मृत्यू झाला.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी गोवंडी येथील १३ वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे १३ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. डेंग्यूची लागण झाल्याने या मुलाला १० आॅगस्ट रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम झाला. पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार तापामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तापामुळेच या रुग्णांचा मृत्यू झाला आहे की नाही, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

ताप कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणे.
डेंग्यू ताप, स्नायू दुखणे, सांधेदुखी, डोकेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे.
लेप्टोस्पायरोसिस
थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काही वेळा त्वचेवर रॅश येणे.



(प्रतिनिधी)

Web Title: One victim of perilous disease every day