Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार सदस्य नोंदणी केली, तरीही विचार होईना : भाजप इच्छुकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपच्या पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील काही भागांत इच्छुक उमेदवारांच्या लगबगीमुळे नाराजीचा सूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपच्या पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील काही भागांत इच्छुक उमेदवारांच्या लगबगीमुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे. एक हजार सदस्य करा, निवडणुकीत नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून बैठकीत देण्यात आले होते. त्यानुसार अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी देताना आता नवे निकष लावले गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिवाचे रान करून टार्गेट पूर्ण केले असताना, ज्यांनी केवळ ५० ते १०० सदस्य नोंदवले आहेत, अशा काही मंडळींना पक्षात महत्त्वाची पदे देण्यात आल्याची स्थानिक पातळीवर चर्चा आहे. याशिवाय, दोन ते चार वेळा निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा तिकीट दिले तर नव्या आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? जुन्याच चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीच्या आधी पदाधिकारी निवडीपूर्वी आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला एक हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, त्यानंतर पदाधिकारी नियुक्ती करताना वयोमर्यादेची अट लागू झाली. परिणामी, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुय्यम पदे देण्यात आली, तर फारसे सक्रिय नसलेले काहीजण प्रमुख पदांवर विराजमान झाले. नगरसेवक पदासाठी वयोमर्यादा नसल्याने, किमान त्या ठिकाणी तरी कार्यकर्त्यांचे काम, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क पाहून उमेदवारी द्यावी, अशी मागणी तरुण कार्यकर्त्यांकडून होत आहे.

तिकीट कापले जाण्याची भीतीतिकीट कापले जाण्याची भीती असलेल्या काही माजी नगरसेवकांनी पत्नी, मुलगी किंवा नातेवाइकांना पुढे करून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. दोन-तीन वेळा नगरसेवक राहिलेले प्रबळ दावेदार स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची नावे थेट इच्छुकांच्या यादीत टाकत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. पक्ष नेतृत्व नेमके कुणाच्या हाती उमेदवारी सोपविते आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीला कितपत न्याय देते, याकडे आता लक्ष आहे. जर काम करुनही त्याचे फळ मिळणार नसेल तर प्रचार तरी का करायचा, असा सवाल इच्छुकांमधून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Despite Membership Drive, BJP Aspirants Feel Overlooked, Express Discontent

Web Summary : BJP aspirants in Mumbai suburbs feel sidelined despite meeting membership targets. They allege preference for inactive members and repeated tickets for former corporators, questioning the reward for their hard work and threatening campaign efforts. Dissatisfaction simmers as deserving candidates are ignored.
टॅग्स :भाजपामहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६