दहशतवाद्यांशी संबंध; ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांपैकी एका विद्यार्थ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:06 IST2026-03-06T08:05:58+5:302026-03-06T08:06:07+5:30
अयान शेखच्या उपकरणात मसूद अझहरचे व्हिडीओ; कारवायांसाठी निधी उभारण्यात सहभाग

दहशतवाद्यांशी संबंध; ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांपैकी एका विद्यार्थ्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी संध्याकाळी कुर्ला, गोवंडीत वास्तव्यास असलेल्या तीन तरुणांच्या निवासस्थानी एकाच वेळी छापा मारून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. अयान शेख असे तरुणाचे नाव असून तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे.
तपासादरम्यान एटीएसने त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाइल फोनसह काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ही उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून त्यामधून दहशतवादी संघटनांशी संभाव्य संबंध दर्शवणारा एक “डिजिटल रोडमॅप” मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या दहशतवादी प्रचाराशी संबंध असल्यामुळे शेख तपास यंत्रणांच्या रडारवर होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जैश-ए-मोहम्मद व आयसिससारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या प्रचाराशी संबंधित माहिती प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी छापेमारी करण्यात आली.
दहशतवादी विचारांचा प्रचार
शेखच्या उपकरणांची तपासणी करताना तपास अधिकाऱ्यांना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्याशी संबंधित अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स आढळल्याचे सांगितले जाते. शेख हा एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि टेलिग्राम चॅनेलवर सक्रिय होता, जिथे दहशतवादी साहित्य प्रसारित केले
जात होते.
तसेच अनेक चॅट्समधून दहशतवादी विचारांचा प्रचार करण्याचे प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, शेखने दहशतवादी साहित्य शेअर केले, काही व्यक्तींना भरती करण्याचा प्रयत्न केला आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्यातही त्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
इतर विद्यार्थ्यांनाही केले प्रभावित
शेखने त्याच्या दोन जवळच्या दोन अभियांत्रिकीचे विद्यार्थी असलेल्या मित्रांनाही कट्टरतावादी सामग्री दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना जैश-ए-मोहम्मद आणि आयसिसच्या प्रचाराशी संबंधित टेलिग्राम गटांमध्ये जोडले. गोवंडी आणि कुर्ला येथील छाप्यांत दोन्ही तरुणांनी शेखने शेअर केलेली दहशतवादी सामग्री पाहिल्याचे समोर आले. मात्र अधिकाऱ्यांच्या मते ते कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. या प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवले आहेत.
राज्यांतील अनेक तरुण सदस्य
पुढील चौकशीत शेखने परदेशातील काही व्यक्ती आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित संशयितांशी झालेल्या संवादाबाबत माहिती दिल्याचेही समोर आले आहे. सूत्रांच्या मते, या एन्क्रिप्टेड गटांमध्ये काही परदेशी नागरिक आणि संशयित सहकारी सहभागी होते, ज्यांचा संबंध स्लीपर सेल आणि भरती नेटवर्कशी असण्याची शक्यता आहे. देशातील विविध राज्यांतील अनेक तरुण या एन्क्रिप्टेड गटांचे सदस्य असल्याचे नोंदीतून दिसून आले आहे.
शेखच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी
सध्या तपास यंत्रणा डिजिटल पुरावे आणि ऑनलाइन हालचालींचा सखोल अभ्यास करत असून, या नेटवर्कमधील इतर व्यक्तींची ओळख पटवणे, कट्टरतावादाच्या प्रक्रियेत असलेल्या लोकांना शोधणे आणि संभाव्य स्थानिक स्लीपर सेलशी असलेले संबंध उघड करण्याचे काम सुरू आहे. तसेच डिजिटल पुरावे आणि संवादांची माहिती इतर राज्यांतील यंत्रणांनाही देण्यात आली आहे. याशिवाय, शेखच्या आर्थिक व्यवहारांची आणि डिजिटल ट्रेलचीही चौकशी केली जात असून, दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या निधीचे स्रोत आणि लॉजिस्टिक मदतीचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणात आणखीन अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.