BMC Election 2026: महापालिकेच्या फेरपडताळणीत एक लाख ६८ हजार दुबार मतदार; २४ हजार मतदारांकडून ठिकाणाबाबत प्रतिज्ञापत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:05 IST2025-12-20T12:04:30+5:302025-12-20T12:05:02+5:30
महापालिकेला फेरपडताळणीत आतापर्यंत एक लाख ६८ हजार मतदार दुबार आढळले आहेत. ही संख्या एकूण दुबार नावांच्या १५ टक्के आहे.

BMC Election 2026: महापालिकेच्या फेरपडताळणीत एक लाख ६८ हजार दुबार मतदार; २४ हजार मतदारांकडून ठिकाणाबाबत प्रतिज्ञापत्र
मुंबई : महापालिकेला फेरपडताळणीत आतापर्यंत एक लाख ६८ हजार मतदार दुबार आढळले आहेत. ही संख्या एकूण दुबार नावांच्या १५ टक्के आहे. पालिका अधिकाऱ्यांनी अशा मतदारांच्या घरोघरी भेट देऊन प्रतिज्ञापत्र भरून घेतले आहे. दरम्यान, एक लाख ६८ हजार दुबार मतदारांपैकी आतापर्यंत २४ हजार ७२१ मतदारांनी प्रतिज्ञापत्र भरून आपल्या मतदानाचे स्थान निश्चित केले आहे.
अनेक मतदारांची नावे दोन ते तीनवेळा असून, ही संख्या ११ लाख एक हजार असल्याचे समोर आले. पालिकेने या नावांची पुनर्पडताळणी करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. आतापर्यंत पालिकेकडून ५७ टक्के मतदारांची पुनर्पडताळणी झाली असून, त्यात १.६८ लाख दुबार मतदार निश्चित झाले आहेत. यामध्ये सुमारे ८९ हजार मतदार एकाच वॉर्डमध्ये दोनदा, तर जवळपास ७९ हजार मतदार वेगवेगळ्या वॉर्डामध्ये नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक दुबार मतदार कुर्ला, चांदिवली साकीनाका येथे असून, त्यांची संख्या १६ हजार ५३२ आहे.
निवडणूक विभागाची 'इन हाऊस' प्रणाली
पालिकेच्या निवडणूक विभागातील २६ वर्षीय कनिष्ठ विश्लेषक श्याम परमेश्वर यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर दुबार मतदारांच्या पुनर्पडताळणी प्रक्रियेत महत्त्वाचे ठरले. या प्रणालीमुळे विखुरलेली माहिती एकत्र आणून दुबार नावे व त्यांची छायाचित्रे वेगाने तपासता आली.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर न करता विकसित केलेल्या या सॉफ्टवेअरने मागील काही दिवसांत मतदारांच्या छाननीत दुबार नावे वगळण्याच्या प्रक्रियेत वेग आणला.
सर्वाधिक दुबार मतदार
एल वॉर्ड - १६,५३२
के पश्चिम - १२,०००
आर दक्षिण - ११,६००