कोरोनावरील एक लाख ३९ हजार ५०० लसी मुंबईत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 06:11 IST2021-01-14T06:11:13+5:302021-01-14T06:11:20+5:30
पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १५ लसीकरण केंद्रांपैकी नऊ ठिकाणी ड्राय रन घेण्यात आली. उर्वरित सहा ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन घेण्यात येईल.

कोरोनावरील एक लाख ३९ हजार ५०० लसी मुंबईत दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनावर मात करणाऱ्या कोविशिल्डचा एक लाख ३९ हजार ५०० लसीचा पहिला साठा बुधवारी पहाटे साडेपाच वाजता मुंबईत दाखल झाला. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ही लस महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष वाहनांद्वारे पोलीस बंदोबस्तात मुंबईत आणली. मात्र, कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोअरेज अद्याप तयार नसल्याने परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील साठवणूक केंद्रात लसीचा साठा ठेवण्यात आला आहे. दररोज १४ हजार ४०० लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.
पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १५ लसीकरण केंद्रांपैकी नऊ ठिकाणी ड्राय रन घेण्यात आली. उर्वरित सहा ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन घेण्यात येईल. मात्र, लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली नसून यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे नियमितपणे पालन करणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.